For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सारांश 1

06:28 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
सारांश 1
Advertisement

ह्या अध्यायाचे नाव आत्मसंयमयोग असे आहे. आत्मसंयम म्हणजे स्वत:च्या मनावर ताबा मिळवणे. मनात येणाऱ्या विचारांमुळे मन भरकटत असते. त्या मनाला भरकटू न देण्यासाठी कोणते उपाय करावेत ते भगवंत ह्या अध्यायात सांगत आहेत. माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांवर आधारित माहिती ज्ञानेंद्रिये त्याला पुरवतात आणि त्याने विषयांचा उपभोग घेण्यासाठी मनुष्य विषयांच्यामागे धावत सुटतो. म्हणून मनात येणाऱ्या विचारांना थांबवण्याची विद्या योगशास्त्र शिकवते. जर मनात विचारच आले नाहीत तर ज्ञानेन्द्राrये त्यासंबंधी माहिती पुरवणार नाहीत.

Advertisement

अध्यायाला सुरवात करताना भगवंत म्हणतात, जो कर्तव्य करून फळाची अपेक्षा करत नाही त्याला संन्यासी किंवा योगी म्हणतात. त्याला जशी प्रेरणा होईल त्याप्रमाणे तो कार्य करत असतो. योग्याच्या मनात कोणतेही विचार येत नसल्याने त्याला विषय फशी पाडू शकत नाहीत तसेच त्याला काहीतरी मिळवावे म्हणून कर्म करण्यात गोडी नसते. त्यामुळे मी अमुक करीन, मी तमुक करीन असे कोणतेही संकल्प तो करत नाही. म्हणजेच संकल्प करणे सोडल्याशिवाय योगी होता येत नाही. योगसाधना करण्यासाठी निरपेक्ष कर्माचा आधार मिळतो तर योगी झाल्यावर त्या अवस्थेत टिकून राहण्यासाठी संयम हेच साधन असते. म्हणून मनात येणाऱ्या विचारांना बांध घालून आपल्या आत्म्याचा आपणच उद्धार करून घ्यावा. सामान्य मनुष्य मनात येणाऱ्या विचारांवर खल करत बसतो आणि इंद्रियांनी दाखवलेल्या आकर्षणानुसार वागतो. त्यामुळे त्याच्या आत्म्याचा उद्धार होणे लांबणीवर पडते. म्हणून मनात विचार न येण्यासाठी सत्संग करावा. असा शांत झालेला आत्मा मान, अपमान, सुख, दु:ख ह्यांची फिकीर न करता केवळ ब्रह्माशी एकरूप होत असल्याने त्याला सर्वत्र ब्रह्माचे दर्शन होत असते. त्याने इंद्रिये जिंकली असल्याने त्याला वेदशास्त्रात सांगितलेले ज्ञान प्रत्यक्षात अमलात आणणे शक्य होते. त्याला सोने, दगड, माती सारखेच वाटत असतात कारण त्याच्या दृष्टीने आत्मोद्धार होण्यासाठी ह्या गोष्टी निरर्थक असतात. तो शत्रू, मित्र, आपला, परका, चांगला, वाईट असा कोणताही भेद न करता ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक असते ते निरपेक्षपणे करत असतो. अर्थातच ज्याला कैवल्यसाक्षात्कार झालेला आहे त्याच्या मनाची अशी अवस्था असते.

पुढे भगवंत योगसाधना कशी करावी ह्याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. ते म्हणतात योगसाधना करणाऱ्याने कोणतीही इच्छा करू नये किंवा वस्तूंचा संग्रह करण्याचा विचार करू नये. त्यासाठी एकांतात बसून मनात येणाऱ्या विचारांना रोखून धरून आत्मविचारात मग्न व्हावे. पवित्र स्थानी स्थिर आसन घालून बसण्याचा सराव करावा. बसण्यासाठी दर्भाच्या आसनावर मृगजीन किंवा वाघाचे कातडे घालून त्यावर वस्त्र घालावे. हे आसन समपातळीत असावे. ताठ बसून कोणतीही हालचाल न करता नाकाच्या शेंड्यावर नजर स्थिर करावी आणि शांत, निर्भय मनाने ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून ईश्वराला अनन्य शरण जावे.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :

.