For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सारांश 1

06:30 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
सारांश 1
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

सातव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे त्यांनी मांडलेल्या ब्रह्मांडाच्या प्रपंचाचा परिचय करून दिला आणि म्हणाले, प्रपंच आणि ब्रह्म किंवा निर्गुण निराकार परमेश्वर ह्या गोष्टी वेगवेगळ्या असून माणसाने विनाशी असलेल्या प्रपंचाचा नाद सोडून देऊन, कायम टिकणाऱ्या परमेश्वराला जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न जो करतो त्याला प्रयाणकाळी सर्वत्र मीच भरून राहिलेलो आहे हे लक्षात आल्याने तो सावध राहून माझे स्मरण करतो. त्यामुळे त्याचा उद्धार होऊन तो माझ्या वैकुंठलोकात निवास करतो. त्याचे जन्म-मरणाचे चक्र संपुष्टात येते. हे ऐकल्यावर अर्जुनालाही परब्रह्माला जाणून घ्यायची इच्छा झाली.

आठव्या अध्यायाच्या सुरवातीला अर्जुन परब्रह्माला जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, आधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय ते सविस्तर सांगा अशी भगवंतांना विनंती करतो.

Advertisement

अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंत म्हणाले, ब्रह्म हे अविनाशी असून प्रपंच हा विनाशी आहे हे अध्यात्म समजावून सांगते. प्रपंच प्रभूसेवा म्हणून करणे हे कर्म होय. अधिभूत म्हणजे शरीर तर, शरीरातील आत्म्याला आधिदैव असे म्हणतात. अधियज्ञ म्हणजे मीच आहे. जेव्हा मनुष्य निरिच्छ होतो तेव्हा त्याला ज्ञानेद्रीयांच्याकडून बाह्य सृष्टीची माहिती मिळवण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे त्यांची ज्ञानेंद्रिये त्याच्या दृष्टीने निरुपयोगी होतात म्हणून तो त्यांचा अधियज्ञ करण्यासाठी अग्नी म्हणून वापर करतो. तसेच त्याच्या इच्छाही संपलेल्या असल्याने तो त्यांचे हवन करतो. अशा माणसाच्या सर्वत्र मीच भरून राहिलेलो आहे हे लक्षात आल्याने त्याला सर्वत्र माझेच दर्शन होत असते. तो त्यात रंगून जातो. जो ह्याप्रमाणे माझी सदैव आठवण काढत असतो त्याला मृत्यूसमयी माझे स्मरण हमखास होते. निरिच्छ होण्याबरोबरच त्याने प्रपंचात वाट्याला आलेले कर्तव्य निरपेक्षतेने करावे. अर्जुना युध्द करणे हे तुझे कर्तव्य असल्याने सदैव माझी आठवण करत तू युद्ध कर. येथे भगवंत एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की, माझ्या आठवणीत युद्ध कर, म्हणजे भगवंतांची आठवण हे माणसाचे प्रमुख ध्येय असावे आणि ते करत करत त्याने कर्तव्य पार पाडावे.

परमपुरुषाचे दर्शन व्हावे अशी योग्याची तीव्र इच्छा असल्याने त्याने अत्यंत तळमळीने त्याचे संपूर्ण चित्त त्याच्याकडे लावलेले असते. इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने त्याला त्याचे महादिव्य असे दर्शन घडते. तो सर्वज्ञ असून सर्वांचा गुरु आहे. तो सुक्ष्महून सूक्ष्म असून त्याचे रूप अचिंत्य आहे. योग्याच्या मनात असलेला अज्ञानाचा अंधार गिळून टाकून तो योग्याच्या मनात आत्मज्ञानाचा उजेड पाडतो. योगी अंत्यसमयी स्थिर चित्ताने परमपुरुषाविषयी अत्यंत प्रेम बाळगून दोन्ही भुवयांच्यामध्ये प्राणाला एकवटतो. अंत्यसमयी त्याचा प्राण त्याच्या देहातून निघून परमपुरुषामध्ये विलीन होतो. विरक्तपणे प्रयत्न केल्याने योग्याना अक्षर ब्रह्म प्राप्त होते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.