सुलेमान सिद्दीकी खान गजाआड
केरळला अटक करून आणले गोव्यात, पत्नीसही अटक : फ्लॅट्स, वाहने, रोकड, मोबाईलसह मोठी मालमत्ता जप्त,पोलिसांच्या 14 पथकांनी देशभरात घेतला शोध
पणजी : रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कोठडीतून पलायन केलेला कुख्यात गुन्हेगार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान मोहम्मद खान याला पकडण्यासाठी जीवाचे रान केलेल्या गोवा पोलिसांनी अखेर सुलेमान व त्याची पत्नी अफसाना ऊर्फ सारिका सिद्दीकी खान या दोघानांही एर्नाकुलम - केरळ येथे अटक करून गोव्यात आणण्यात यश मिळवले आहे. भू-बळकाव आणि इतर गुह्यांमध्ये सहभाग असलेला सुलेमान खान हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कोठडीतून पसार झाला होता. सुलेमानला दोन दिवसांपूर्वीच पकडण्यात आले होते, परंतु पोलिसांच्या प्रक्रियेनुसार ही बाब उघड करण्यात आली नव्हती. गोवा पोलिसांनी केरळ येथे जाऊन सुलेमान खान याला ताब्यात घेऊन गोव्यात पोहोचल्यानंतर काल सोमवारी सायंकाळी पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई, अधीक्षक राहुल गुप्ता, आयपीएस अधिकारी वर्षा शर्मा आदी उपस्थित होते.
देशभरात शोधत होती 14 पथके
महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले की, सिद्दीकी ऊर्फ सुलेमान मोहम्मद खान (वय 54, रा. माडेल-थिवी, बार्देश) याच्यावर मालमत्तेची फसवणूक, खूनासह हिंसक गुह्यांमध्ये सहभाग प्रकरणी गुन्हे नोंद आहेत. त्याला 12 नोव्हेंबर 2024 रोजी कर्नाटकातील हुबळी येथे पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला विविध गुह्यांखाली क्राईम ब्रांचच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र 12 डिसेंबर 2024 रोजी कॉन्स्टेबल अमित नाईक याच्या मदतीने त्याने कोठडीतून पलायन केले होते. अमित नाईकही त्याच्याबरोबर गेला होता. तेव्हापासून अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिसांची 14 पथके रात्रंदिवस सिद्दीकीच्या शोधात देशातील विविध भागात कार्यरत होती.
सुलेमान सिद्दीकी याने पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याचा वापर केल्यानंतर हुबळी येथील हजरतसाब कासिमसाब बावंड याचा फरार होण्यासाठी वापर केला. सुलेमानने अमित नाईक आणि हजरत अली या दोघांनाही पैशांचे आमिष दाखवले होते. त्यानंतर सिद्दीकीने हजरतसाब बावंडर याला सोडून वारंवार कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळमधील आपली ठिकाणे बदलली. पोलिसांचा तपास भरकटत जावा, यासाठी त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गोवा पोलिसांच्या पथकांनी अथक परीश्रम घेऊन त्याच्या कुटुंबाला ‘ट्रॅक’ करण्यास सुरवात केली आणि त्यानंतर सिद्दीकी पूर्णपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
चौदा पथकांमधून 70 पोलिसांची कामगिरी
गुन्हे शाखा, एसआयटी, सायबर सेल आणि उत्तर गोवा पोलिस असे मिळून सुमारे 70 हून अधिक पोलिस एकूण 14 पथकांमधून सुलेमानचा शोध घेत होते. देशातील विविध ठिकाणी म्हणजे हुबळी, बंगळुरू, उत्तर कन्नड, पुणे, मुंबई, गोवा आणि केरळ या ठिकाणी सिद्दीकीच्या शोधासाठी रात्रंदिवस काम करीत होते. यामध्ये सिद्दीकीच्या ओळखीच्या लोकांची तपासणी करण्यात, सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आणि अनेक तांत्रिक तपास करण्यात एकमेकांशी समन्वय साधून पोलिसांच्या टीमने सुलेमानला गजाआड करण्यात यश मिळविले.
सुलेमानसह पत्नी अफसानाही गजाआड
केरळ पोलिसांच्या मदतीने त्याला आणि त्याची पत्नी अफसाना ऊर्फ सारिका सिद्दीकी खान हिला एर्नाकुलम (केरळ) येथे पकडण्यात आले. सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याच्यावर विविध ठिकाणी गंभीर स्वऊपाचे सुमारे 13 गुन्हे आहेत, असेही पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले.
सुलेमान सिद्दीकीवरील कारवाईचा तपशील
- सुलेमाने पोलिसांना चकविण्यासाठी साहिल अली खान, मोहम्मद अली खान, डॅनियल सय्यद, समीर पटेल, अरमान शाह यांसह 13 नावे वापरल्याचे उघड.
- हुबळी येथून सिद्दीकी खानला पलायन करण्यास मदत करणाऱ्या हजरतसाब कासिमसाब बावंडर (वय 32) याला हुबळी येथून अटक.
- अफसाना ऊर्फ सारिका खान (वय 38) हिलाही अटक.
- अफसानाच्या नावावर असलेले कारवार येथील कार्यालयासह 4 फ्लॅट जप्त.
- सिद्दीकी खान याने विविध गुह्यातून मिळवलेली रक्कम त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका खान आणि त्याची फर्म, मेसर्स सिदसारिका हिलाइट बिल्डर्स ग्रुप यांच्या नावाखाली कर्नाटकातील फ्लॅट्स आणि मालमत्तांमध्ये गुंतवणुकीसाठी वापरल्याचे उघड.अफसाना खान हिच्यावरही गुन्हा नोंद.
पोलिसांनी सुलेमानच्या जप्त केलेल्या वस्तू
स्टॅम्प पॅड, 2 सेल्फ इंक रबर स्टॅम्प, 12 मोबाईल फोन, रोख ऊपये 2 लाख 66 हजार 300 ऊपये, पॅन कार्ड, 2 लॅपटॉप, 1 टॅब, 1 टायपरायटर, 12 चारचाकी वाहने, 3 दुचाकी, विविध 16 बँकांची पासबूक, 30 चेकबूक, आदी साहित्य पोलिसांनी जप्त केलेले आहेत.