सुलेमान खानची पुन्हा कोठडीत रवानगी
गोमेकॉत केली किरकोळ शस्त्रक्रिया
प्रतिनिधी/ पणजी
पोलिस कोठडीतून पसार झालेला आणि 8 दिवसांनी केरळ पोलिसांच्या मदतीने अटक केलेला जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सुलेमानला अटक केल्यानंतर उपचारार्थ गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. 25 डिसेंबर रोजी त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली. काल गुरुवारी सायंकाळी त्याची पुन्हा तुऊंगात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.
सोमवारी 23 रोजी सिद्दीकीला गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गोव्यात आणल्यानंतर जुने गोवे पोलिसांनी त्यास अटक केली होती. त्याच्याविऊद्ध पोलिस कोठडीतून पलायन तसेच बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक याला होन्नावर-कुमठा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याने ‘आर्म अॅक्ट’ कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी सिद्दीकीला पणजी न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी रात्री त्याने आजारपणाचे निमित्त पुढे करून तो गोमेकॉत भरती झाला होता. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून बुधवारी त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया केली आणि त्याला परत तुऊंगात पाठविण्यात आले. शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास सुलेमान खान याने रायबंदर येथील एसआयटीच्या पोलिस कोठडीतून बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याच्या सहाय्याने पलायन केले होते. त्या दिवसापासून गुन्हा शाखेच्या पोलिसांसह गोवा पोलीस संशयित सिद्दीकीचा शोध घेत होते. पोलिसांनी हुबळी आणि कारवारसह कर्नाटक राज्यातील इतर शहरे पिंजून काढली होती. तसेच हैदराबादमध्येही त्याचा शोध घेण्यात आला होता. शेवटी पलायन नाट्याच्या आठ दिवसांनंतर एर्नाकुलम-केरळ पोलिसांच्या मदतीने गोवा पोलिसांनी सिद्दीकीला अटक केली. सिद्दीकी हा केरळमध्ये असल्याची चोख माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गोवा पोलिसांनी केरळ पोलिसांना याबाबत माहिती देत सतर्क करीत त्याला गजाआड केले. पोलिसांनी अफसाना उर्फ सारीका खान या सिद्दीकीच्या पत्नीला देखील अटक केली आहे. सिद्दीकी याने पत्नी अफसाना व मुलांसमवेत केरळमध्ये आश्रय घेतला होता. त्यापूर्वी त्याने गोवा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरल्या. मोबाईल फोन व वास्तव्याची ठिकाणे त्याने वारंवार बदलली होती. मात्र प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात आल्यामुळे तो पोलिसांच्या हाती सापडला.