सुलक्षणा सावंत यांच्याकडून बदनामीला प्रत्युत्तर!
आप नेते संजय सिंगवर 100 कोटींचा खटला : न्यायालयाकडून संजय सिंग यांना समन्स जारी
पणजी : राज्यात गाजलेल्या नोकरीसाठी पैसे घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांची पत्नी सुलक्षणा सावंत यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप करणारे आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्यावर अखेर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला 100 कोटी रुपये भरपाईचा असून ‘तो’ व्हिडिओही समाजमाध्यमांवरून त्वरित काढून टाकावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासंबंधी डिचोली न्यायालयाने सिंग यांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात समन्स बजावले आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांनी दिली आहे.
मंगळवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आमदार दाजी साळकर आणि भाजपचे सचिव सिद्धेश नाईक यांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून विरोधक मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीवर अकारण भ्रष्टाचाराचे आरोप करू लागले होते. त्या आरोपांना भाजपने वेळोवेळी उत्तरही दिले होते. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत आप नेत्यांनी थेट पत्रकार परिषदेतूनच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा नामोल्लेख करत भ्रष्टाचाराचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोपकर्त्यांवर अब्रुनुकसानी खटला दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सौ. सावंत यांनी मंगळवारी डिचोली नागरी न्यायालयात आपचे नेते सिंग यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे, असे वेर्णेकर यांनी सांगितले.
संजय सिंग हे जामिनावर सुटलेले आरोपी : वेर्णेकर
आपचे खासदार संजय सिंग हे स्वत: असंख्य घोटाळ्यात सहभागी आहेत. अबकारी घोटाळ्यात तर सध्या ते जामिनावर सुटलेले आहेत. अशा व्यक्तीला इतरांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा सवाल वेर्णेकर यांनी उपस्थित केला. सौ. सावंत या भाजप कार्यकर्ता तथा महिला मोर्चा प्रभारी आहेत. तरीही त्यांनी कधीच प्रशासनात हस्तक्षेप केलेला नाही. अशावेळी आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा निर्माण केल्याबद्दल त्यांनी सिंग यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे सिंग हे सराईत गुन्हेगार असून ‘आधी आरोप करायचे आणि नंतर माफी मागायची’ ही त्यांची कार्यपद्धती बनलेली आहे. अशा व्यक्तीवर किती सुद्धा विश्वास ठेवावा हे लोकांनी ठरवावे, असे गिरीराज वेर्णेकर म्हणाले.
दरम्यान, राज्यात एकामागून एक घोटाळे उघडकीस आले. त्यामुळे सरकार गोत्यात आले, हे सर्व प्रकार का घडले असावे, असे पत्रकारांनी विचारले असता, कोणत्याही घोटाळ्यामुळे सरकार गोत्यात आलेले नाही. उलटपक्षी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप झाले. मात्र कोणताही आडपडदा न ठेवता त्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. काही प्रकरणांमध्ये तर स्वत: मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेत जमीन घोटाळ्यासाठी एसआयटी स्थापन केली. त्याचबरोबर नोकरीसाठी पैसे प्रकरणात पहिला एफआयआर नोंद करण्यास पोलिसांना भाग पाडले आहे. त्याही पुढे जाताना त्यांनी या घोटाळ्यात फसगत झालेल्या लोकांनी तक्रारी करण्यास पुढे यावे, असे आवाहनही केले व प्रतिसाद म्हणून असंख्य तक्रारींची नोंदही झाली. यावरून मुख्यमंत्र्यांची पारदर्शक कार्यपद्धती स्पष्ट होते, असे वेर्णेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवे होते
पोलिसांच्या कैदेतून पळून गेलेला कुख्यात गुन्हेगार सुलेमान सिद्धीकी हा त्याने बळकावलेल्या जमिनीत बांधलेल्या बेकायदा घरांवर बुलडोझर फिरविल्याच्या घटनेनंतर प्रसिद्धीत आला. मात्र त्यासाठी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले नाही. आज जेव्हा तो फरार झालेला आहे तेव्हा विरोधक सरकारवर टीका करतात. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी माहिती देताना पोलिस योग्य तपास करत असून कोणत्याही परिस्थितीत सुलेमानला पकडण्यात येईल,असे ठामपणे सांगितल्याचे वेर्णेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची राजकीय इच्छाशक्ती
‘नोकरीसाठी पैसे’ घोटाळ्यावरून जो गोंधळ निर्माण झाला तो कायमस्वऊपी समाप्त व्हावा या उद्देशाने गोवा कर्मचारी निवड आयोग स्थापन करण्यात आला असून पारदर्शक रोजगारभरती करण्यात येणार आहे. यावरून मुख्यमंत्र्यांची राजकीय इच्छाशक्ती दिसून येते, असे वेर्णेकर म्हणाले. अन्य एका प्रश्नावर बोलताना त्यांनी, सुलेमानने केलेल्या कथित आरोपांचा व्हिडिओ असलेला पॅन ड्राईव्ह विरोधकांकडे कसा पोहोचला? असा सवाल उपस्थित केला. त्या व्हिडिओची सत्यता तपासतानाच या प्रकरणाची प्रत्येक अंगाने सखोल चौकशी झाली पाहिजे, असे मत वेर्णेकर यांनी व्यक्त केले. पोलिसस्थानकात एकापेक्षा जास्त सीसीटीव्ही लावलेले आहेत, हे जाणत असतानाही कॉन्स्टेबल अमित नाईकने सुलेमानला पळून जाण्यात मदत केली, हेच संशयाचे आणि सरकारच्या बदनामीचे प्रमुख कारण असून त्यामागे राजकीय हस्तक्षेप आहे का? असे विचारता, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, तर कदाचित सुलेमानने देऊ केलेल्या तीन कोटी ऊपयांच्या लालसेपोटी अमितने ते कृत्य केले असावे, असे वेर्णेकर म्हणाले. दरम्यान, या प्रश्नी दाजी साळकर तसेच सिद्धेश नाईक यांनीही विचार मांडले.