अकाली दल अध्यक्षपदी सुखबीर बादल
वृत्तसंस्था / चंदीगढ
पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी अकाली दलाच्या बैठकीत त्यांची निर्विरोध निवड करण्यात आली. 2027 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून त्या निवडणुकीत अकाली दलाला विजयी करणे हे आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन बादल यांनी नियुक्तीनंतर केले.
त्यांना पाच महिन्यांपूर्वी धार्मिक शिक्षा म्हणून अध्यक्षपद सोडावे लागले होते. आता त्यांची ही शिक्षा पूर्ण झाली आहे. त्यामुळे ते पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास पात्र ठरले आहेत. 2007 ते 2017 या अकाली दलाच्या सत्ताकाळात त्यांच्या हातून अनेक चुका घडल्याने अकाल तख्ताच्या आदेशानुसार त्यांना अध्यक्षपदाचा त्याग करावा लागला होता. हा पाच महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. माझी निवड केल्यामुळे मी कार्यकर्त्यांचा आभारी आहे. शीख समाज बलवान करणे आणि पंजाबच्या हिताचे रक्षण करणे ही आमची दोन महत्वाची उद्दिष्ट्यो आहेत. ती पूर्ण करण्यासाठीं आता मला कार्यकर्त्यांनी बळ दिले आहे. सुखबीरसिंग बादल हे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र आहेत. 2007 ते 2017 या काळात ते पंजाबचे उपमुख्यमंत्री होते.