सुकांत कदम, नितेशकुमार बाद फेरीत
वृत्तसंस्था /पॅरिस
येथे सुरू असलेल्या 2024 च्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी दर्जेदार कामगिरी केली आहे. भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम आणि नितेशकुमार यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर महिला एकेरीत भारताच्या मनदीप कौरने पुढील फेरीत स्थान मिळविले आहे.
बॅडमिंटन या क्रीडा प्रकारातील गट ए, एसएल-3 मध्ये झालेल्या पुरूष एकेरीच्या सामन्यात भारताच्या नितेशकुमारने थायलंडच्या बूनसुनचा 21-13, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत बाद फेरीत स्थान मिळविले. प्राथमिक फेरीमध्ये नितेशने आपले तिन्ही सामने यापूर्वी जिंकले आहेत. गट ए मधील अन्य एका लढतीत भारताच्या मनोज सरकारला बाद फेरी गाठता आली नाही. मनोजने चीनच्या यांगचा 21-15, 21-11 असा पराभव केला असला तरी त्याला अ गटात पहिल्या तीन बॅडमिंटनपटूत स्थान मिळविता आले नसल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत मनोजने एकेरीत कास्यपद मिळविले होते.
गट ब एसएल-4 मधील झालेल्या सामन्यात सुकांत कदमने थायलंडच्या सिरीपाँगचा 21-12, 21-12 असा पराभव करीत बाद फेरीत प्रवेश केला. सुकांतने यापूर्वी आपले दोन्ही सामने जिंकून पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. महिलांच्या विभागात गट ब एसएल-3 कॅटगिरी मधील लढतीत भारताच्या मनदीप कौरने ऑस्ट्रेलियाच्या व्हिनॉटचा 21-23, 21-10, 21-17 असा फडशा पाडत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पॅरा बॅडमिंटनपटूंनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कास्य अशी चार पदके मिळविली होती.