सुकळवाड येथे गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा; 3 लाख 84 हजारांची दारू जप्त, मालवण पोलिसांची धडक मोहीम सुरूच
मालवण तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून सुकळवाड येथे ही कारवाई करण्यात आली.
सुकळवाड येथे करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान पोलिसांच्या पथकाला मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली. पोलिसांनी ही दारू जप्त केली असून, तिची एकूण किंमत 3,84,300 असल्याची माहिती दिली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्री आणि साठवणुकीच्या प्रकारांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक सुकळवाड येथे दाखल झाले होते. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार आणि हेड कॉन्स्टेबल सोनाली पाटकर यांचा समावेश होता.
अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले!
मालवण पोलिसांकडून तालुक्यात सातत्याने छापेमारी आणि कारवाई सुरू असल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. अशा अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आगामी काळातही कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
तालुक्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
