सुजित कालकलला सुवर्ण
वृत्तसंस्था / नोव्ही साद (सर्बिया)
23 वर्षांखालील वयोगटातील येथे झालेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय मल्ल सुजित कालकलने पुरूषांच्या फ्रीस्टाईल 65 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले.
65 किलो वजन गटातील झालेल्या अंतिम लढतीत सुजित कालकलने उझबेकच्या युमीजॉन जेलोलोव्हचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुजितला ही लढत जिंकण्यासाठी केवळ 5 मिनिटांचा कालावधी लागला. सुजितने यापूर्वी विश्व कुस्ती स्पर्धेत एकदाही विजेतेपद मिळविले नव्हते. पण त्याने 2022 आणि 2025 साली झालेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत विजेतेपद तर 2022 साली झालेल्या 20 वर्षांखालील वयोगटातील आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. गेल्या वर्षी झालेल्या 23 वर्षांखालील वयोगटातील विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळविले होते.