शेतीमालाचे भाव पाडण्याच्या कुटील धोरणामुळे राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या ; राजू शेट्टी
सरुड प्रतिनिधी
भाजप सरकारने शेतीमालाचे व त्यापासुन तयार होणाऱ्या पदार्थांचे भाव पाडण्याचे कुटील धोरण अवलंबिल्यामुळे राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या असुन शेतकऱ्यांच्या या आत्महत्यांनी भाजप सरकारचे हात रंगले असल्याचा आरोप माजी खा. राजू शेट्टी यांनी सरुड येथील सभेत केला.
चालु गळीत हंगामात ऊसाला एफ आर पी अधिक शंभर रु अधिक दर मिळवून दिल्याबद्दल माजी खा . शेट्टी यांचा सरुड ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला . या प्रसंगी आयोजीत सभेत ते बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच भगवान नांगरे - पाटील हे होते.
माजी खा. राजू शेट्टी पुढे म्हणाले , जागतिक बाजारपेठेत शेतीमालाचे व त्यापासुन तयार होणाऱ्या साखर , इथेनॉल आदी पदार्थांचे भाव वाढत असताना भाजप सरकारने या शेतीमालावर तसेच साखर , इथेनॉलवर निर्यातबंदी लादत त्यांचे भाव जाणीवपुर्वक नियत्रंणात ठेवले आहे . तर दुसरीकडे मात्र रासायनिक खतांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ होत असतानाही खतांच्या ही दरवाढ नियंत्रणात ठेवलेली दिसत नाही . परिणामी शेतीमधुन अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे . यातुनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्येही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे . शेतकर्यांच्या या आत्महत्यांना सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार आहे . साखर कारखान्यांच्या काटामारीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले , २००९ पुर्वी जादा साखर उतार दाखविण्यासाठी साखर कारखानदारांमध्ये स्पर्धा असयाची . परंतू त्यानंतर याच उतार्याच्या आधारे दर देण्याची वेळ आली त्यावेळी याच कारखानदारांनी साखर उतारा कमी दाखवत ऊसाला योग्य भाव देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे . काटामारीतुन व साखर उतारा चोरीतुन जादा दिसणारा ऊस कारखानदारांनी आपल्या बगलबच्यांच्या नावावर दाखविला आहे . चोरीचे हे पितळ उघडे पाडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला असुन पाचशे टनापेक्षा जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची माहीती मागवली आहे . यातुन सर्वच साखर कारखानदारांचे काटामारीचे बिंग फुटल्याशिवाय राहणार नाही . शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठविण्यापूर्वी खासगी वजन काट्यावरून वजन करुनच पाठवावा . असा ऊस स्विकारण्यास कारखानदारांनी टाळाटाळ केल्यास त्वरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधा . संघटना आपल्या स्टाईलने त्यांना हा ऊस स्विकारण्यास भाग पाडेल .यावेळी सरपंच भगवान नांगरे , भाई भारत पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली .
या कार्यक्रमास स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सागर संभूशेटे , तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर , वसंत पाटील ( ओकोली ) , माजी सरपंच उत्तम पाटील , मनिष तडावळेकर, काका पाटील , शामराव सोमोशी , रायसिंग पाटील , जयसिंग पाटील - चरणकर आदीसह सर्व ग्रा . प . सदस्य व सरुड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वागत व प्रास्ताविक राजाराम मगदूम यांनी तर सुत्रसंचालन प्रशांत मिरजकर यांनी केले . आभार सचिन पाटील यांनी मानले.
गतवेळची चुक सुधारुन शेट्टी यांना पुन्हा लोकसभेत पाठवूया
आपल्या भाषणात सरपंच भगवान नांगरे म्हणाले , गतवेळच्या लोकसभा निवडणूकीत झालेली चुक सुधारून शेतकऱ्यांच्या हितासाठी येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कोणत्याही गटातटाचा विचार न करता राजू शेट्टी यांच्यासारख्या शेतकरी चळवळीतील लढाऊ नेत्याला शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पुन्हा लोकसभेत पाठवुया . त्यांच्या या आवाहनास उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट व घोषणाबाजी करत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला .