दिग्गज उद्योजकाच्या सुनेची आत्महत्या
पतीने केला होता दुसरा विवाह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रसिद्ध पान मसाला कंपनी कमला पसंदचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्तिने दिल्लीतील घरात गळफास लावून घेत आयुष्य संपविले. दीप्तिने लिहिलेली सुसाइड नोट हस्तगत करण्यात आली असून पोलिसांनी ती ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. याचदरम्यान दीप्ति आणि तिचा पती हरप्रीत यांच्यात भांडणं सुरू होती असे समोर आले आहे. दीप्तिचा मृतदेह मंगळवारी रात्री घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दिल्ली पोलिसांना तपासादरम्यान सुसाइड नोटसोबत एक डायरी मिळाली आहे. यात दीप्तिने पतीसोबत संबंध सुरळीत नसल्याचे नमूद पेले आहे. याचबरोबर तिने सुसाइड नोटमध्ये ‘प्रेम नाही, विश्वास नाही’ असे लिहून स्वत:ची निराशा व्यक्त केली आहे.
दीप्ति आणि हरप्रीत यांचा विवाह 2010 साली झाला होता. या जोडप्याला 14 वर्षांचा मुलगा देखील आहे. दीप्तिच्या आत्महत्येप्रकरणी सध्या सर्व पैलूंचा विचार करत तपास केला जातोय. तसेच उत्तरीय तपासणीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दीप्तिचा पती हरप्रीतने दोन विवाह केले होते. त्याने दक्षिणेतील अभिनेत्रीसोबत दुसरा विवाह केला होता.
पान मसाला कंपनी कमला पसंदचे मालक हे कानपूरशी संबंधित आहेत. कमला कांत चौरसिया हे सुमारे 40-45 वर्षांपूर्वी गुमटी येथे पान मसाला विकायचे, परंतु आता त्यांच्या कंपनीची उलाढाल अब्जावधी रुपयांची आहे. चौरसिया यांनी 1980-85 दरम्यान पान मसाला घरातच तयार करण्यास सुरुवात केली होती. कंपनीचा मालकी हक्क केपी समूह आणि कमला कांत कंपनीकडे आहे. याचे संस्थापक कमला कांत चौरसिया आणि कमल किशोर चौरसिया आहेत.