रुग्णवाहिका चालकाची गळफासाने आत्महत्या
बेळगाव : खासगी इस्पितळातील रुग्णवाहिकेच्या चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री महात्मा फुले रोड परिसरात घडली आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ओमकार फकिरा पवार (वय 25) मूळचा राहणार कारलगा, ता. खानापूर, सध्या राहणार महात्मा फुले रोड, शहापूर असे त्याचे नाव आहे. शनिवार दि. 12 एप्रिलच्या सायंकाळी 4 ते 6 या वेळेत आपण भाड्याने रहात असलेल्या घरात गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे. यासंबंधी ओमकारचे वडील फकिरा पवार यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आपण काम करीत असलेल्या इस्पितळातील श्याम नामक एका गृहस्थाने आपल्याला त्रास दिला आहे. पगारही दिला नाही. म्हणून आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.