Sangli Crime: धर्मांतरासाठी छळ, विवाहितेची आत्महत्या, कुपवाडमधील घटनेने खळबळ
सासरच्या लोकांनी पूर्वीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता
कुपवाड : बळजबरीने ख्रिश्चन धर्मांतर करण्यासाठी सासरच्या लोकांनी नवविवाहित व गरोदर हिंदू महिलेचा अनेक महिन्यांपासून अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. सासरच्या त्रासाला वैतागलेल्या गरोदर महिलेने राहत्या घरातच गळफासाने आत्महत्या केल्याची घटना घडली.
ऋतुजा ऊर्फ गौरी सुकुमार राजगे (२८, रा. अश्विनी हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, कुपवाड) असे या विवाहितेचे नाव आहे. तिचा धर्मातरासाठी सासरच्यांनी खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. विवाहितेने धर्मांतर केले नाही, घरबांधकामासाठी वडिलांकडून पैसे आणले नाहीत, असा तगादा पती, सासू व सासरे यांनी लावला होता.
त्यांच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार विवाहितेचे वडील चंद्रकांत पाटील (रा. गुंडेवाडी, ता. मिरज) यांनी कुपवाड पोलिसात दिली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये संशयित पती सुकुमार सुरेश राजगे (२९), सासू अलका सुरेश राजगे (४९) व सासरा सुरेश राजाराम राजगे (५३, सर्व रा. कुपवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. विवाहिता गुंडेवाडी येथील धनगर समाजाची असून तिचा विवाह सुकुमार राजगे या तरुणाशी २४ मे २०२१ रोजी मालगाव येथे झाला होता. सासरच्या लोकांनी पूर्वीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. हे कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे या प्रकरणात धर्मगुरूसह सर्वांची सखोल चौकशी होणार आहे