आत्महत्या राज्यात...खळबळ देशात!
बिदर जिल्ह्यातील एका कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. आपल्या मृत्यूला पंचायत राज व ग्रामीण विकासमंत्री प्रियांक खर्गे यांच्याजवळचे नेते राजू कपनूर हेच जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून ठेवून त्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मंत्री प्रियांक खर्गे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणाशी आपला काही एक संबंध नाही. त्यामुळे आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ठामपणे सांगत प्रियांक खर्गे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या प्रकरणात प्रियांक खर्गे यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. सचिन पांचाळ या कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सरकारने सीआयडीकडे सोपविली आहे. सीआयडी चौकशीत सत्य बाहेर पडणार नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी सचिनच्या कुटुंबीयांनी केली आहे. सध्या या प्रकरणावरून कर्नाटकाचे राजकारण ढवळून निघाले आहे.
भाजपच्या राजवटीत के. एस. ईश्वरप्पा, ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री असताना बेळगाव येथील संतोष पाटील (वय 40) या कंत्राटदाराने उडुपी येथे आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या या स्थितीला मंत्री के. एस. ईश्वरप्पा हेच कारणीभूत असल्याची चिठ्ठी त्याने लिहून ठेवली होती. काँग्रेसने हे प्रकरण उचलून धरले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते बेळगावला आले होते. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार आदी नेत्यांनी संतोष पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्या कुटुंबीयांना धीर दिला होता. ईश्वरप्पा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन छेडले होते. शेवटी राजकीय दबाव वाढल्यामुळे ईश्वरप्पा यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. जो न्याय ईश्वरप्पा यांच्याबाबतीत लावला त्याच न्यायाने मंत्री प्रियांक खर्गे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र व विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी तर प्रियांक खर्गे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणावरून या दोन पक्षातील संघर्ष आणखी वाढणार आहे.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी बी. वाय. विजयेंद्र यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. कर्नाटकातील राजकीय परिस्थितीची माहिती करून देण्याबरोबरच एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांचा कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात समावेश कसा आहे? यासंबंधीही माहिती दिली आहे. कंत्राटदार सचिन पांचाळ याने रेल्वेखाली का आत्महत्या केली? प्रियांक खर्गे यांच्या जवळच्या नेत्याचा या प्रकरणात सहभाग कसा आहे? प्रियांक खर्गे यांचा या प्रकरणातील सहभाग कितपत आहे? आदींविषयीही त्यांनी माहिती दिली आहे. भाजपच्या हायकमांडने या मुद्द्यावर आंदोलन तीव्र करण्यासाठी परवानगी दिली आहे. माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या वक्फ बोर्ड विरोधातील आंदोलनाआड पक्षविरोधी कारवाया कशा सुरू आहेत? याकडेही बी. वाय. विजयेंद्र यांनी हायकमांडचे लक्ष वेधले आहे.
दि. 9 ते 19 डिसेंबरपर्यंत बेळगाव येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या काळात भाजपमधील दुफळी स्पष्टपणे जाणवली होती. बेळगाव अधिवेशनानंतर किंवा मकरसंक्रांतीनंतर भाजपला नवे सारथी मिळणार, अशी चर्चा सुरू झाली होती. बी. वाय. विजयेंद्र यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. सध्या तरी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर विजयेंद्र हेच कायम राहणार असे संकेत आहेत. विजयेंद्र यांच्या तक्रारीवरून बंडोबांवर पक्षाचे नेतृत्व कोणती कारवाई करणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बंडोबांवर कारवाई होणार की त्यांना समज देऊन सोडून देणार, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस नेतृत्वाने मात्र प्रियांक खर्गे यांचे समर्थनच केले आहे. एका कन्नड दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाजपविरुद्ध जोरदार टीका केली आहे. भाजपचे आपण व आपले वडील मल्लिकार्जुन खर्गे आम्ही दोघे टार्गेट आहोत. त्यासाठीच आपल्याशी संबंध नसलेल्या प्रकरणात आपला राजीनामा मागितला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रियांक खर्गे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांकडून सुरू असलेला दबाव असाच कायम राहिला तर त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. या प्रकरणापाठोपाठ बेळगावसह राज्यातील वेगवेगळ्या सरकारी इस्पितळात बाळ-बाळंतिणींच्या वाढत्या मृत्यू प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव व महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाने आंदोलन हाती घेतले आहे.
काँग्रेस नेत्यांना थंड करण्यासाठी भाजप रस्त्यावरच्या लढाईत आक्रमक बनला आहे. कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात सरकारविरुद्ध टीका होत आहे. दुसरीकडे लवकरच मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार, याचे संकेत मिळत आहेत. स्वत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हायकमांडच्या पातळीवर यासंबंधी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अकार्यक्षम मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याबरोबरच कर्नाटकातील अलीकडे झालेल्या दोन आत्महत्या प्रकरणांनी देशभरात खळबळ माजली आहे. पत्नी व तिच्या कुटुंबीयांच्या जाचामुळे अलीकडेच अतुल सुभाष नामक अभियंत्याने फेसबुक लाईव्हवर आत्महत्या केली होती. अशीच आणखी एक घटना हासनमध्ये घडली आहे. पत्नी व तिच्या कुटुंबीयांच्या जाचाला कंटाळून प्रमोद नामक युवकाने हेमावती नदीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. अतुल सुभाष प्रकरणाची तर देशभरात चर्चा झाली. पती व सासरच्या मंडळींच्या जाचामुळे विवाहितेच्या आत्महत्येनंतर जशी चर्चा व्हायची तशीच चर्चा पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या युवकांमुळे होऊ लागली आहे. कर्नाटकात अशा घटना वाढू लागल्या आहेत.