For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

11:40 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement

सिव्हिलमध्ये उपचार, घटनेमुळे खळबळ, जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी पोलिसांना सूचना

Advertisement

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली. यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. लागलीच त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कुमार कल्लाप्पा कोप्पद (वय 23, रा. लगमेश्वर, ता. गोकाक) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो अत्यवस्थ असून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अत्यवस्थ तरुणाची माहिती घेण्याची सूचना केली आहे. घटनेची नोंद मार्केट पोलिसात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 3.30 वाजता सदर तरुण कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. आपल्या चप्पल कार्यालयाबाहेर काढून तो जिल्हाधिकारी कक्षाकडे गेला. जिल्हाधिकारी कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान तरुणाने आपल्याकडील झुरळ मारण्याच्या पाकिटातील पावडर बाटलीमध्ये घालून तेथेच प्राशन केली. काहीवेळात तो अत्यवस्थ होऊन तेथेच कोसळला. त्याच्या शेजारी झुरळ मारण्याच्या औषधाचे पाकीट पडले होते. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच घटनेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात असणाऱ्या पोलिसांना देण्यात आली. पोलीस राजू हवालदार यांनी तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली. याबरोबरच रुग्णवाहिकेला कळविण्यात आले. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विषप्राशन केलेली औषधाची बाटली ताब्यात घेतली. तर अत्यवस्थ तरुणाला रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून तो अत्यवस्थ आहे. घटनेची माहिती मिळताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली.

घरगुती भांडणातून...

Advertisement

घरगुती भांडणातून सदर तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याला आजार असल्याने तो गेल्या वर्षभरापासून बिम्समध्ये उपचार घेत असल्याची माहिती बिम्सच्या संचालकांकडून उपलब्ध झाली आहे. घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत असून तो अत्यवस्थ आहे. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांना सूचना करण्यात आली आहे. तो शुद्धीवर आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

-नितेश पाटील, जिल्हाधिकारी 

Advertisement
Tags :

.