तक्रार घेत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न
एकंबे :
कोरेगाव पोलीस ठाण्यात बराचवेळ थांबूनदेखील पोलीस तक्रार घेत नसल्याने संतप्त झालेला दिव्यांग युवक अजय सुरेश येवले (रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर) याने पोलीस ठाणे आवारातील मारुती मंदिराच्या पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसंगावधन राखत त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र प्रकृती अस्वथामुळे त्याला तातडीने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अजय येवले हा दिव्यांग युवक असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून शहर परिसरात ओळखला जातो. दोनच दिवसांपूर्वी त्याच्या पायावर स्थानिक युवकांनी दुचाकी घालून जखमी केले होते. त्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. गुरुवारी सायंकाळी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तो स्थानिक युवकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. त्यावेळी बराचवेळ झाला तरी आपली तक्रार कोण घेत नाही, आपल्याला दाद देत नाही, या मानसिकेतून संतप्त झालेल्या येवले याने पोलीस ठाण्याच्या पिछाडीस असलेल्या मारुती मंदिराच्या पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यादरम्यान, भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी हे पोलीस ठाणे आवारात आले होते, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, येवले याचा गळफास सोडविला आणि त्याला सहकाऱ्यासमवेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले, मात्र प्रकृती अस्वथ्यामुळे त्याला तातडीने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले.
अजय येवले याच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह कोरेगाव उपविभागातील सर्वच पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी कोरेगावात सायंकाळाच्या सुमारास दाखल झाले असून, त्यांनी येवले याला जखमी करणाऱ्या युवकांचा शोध सुरु केला आहे.
दुचाकी जाळण्याचा झाला होता प्रयत्न
अजय येवले याची दिव्यांग युवकांसाठी असलेली दुचाकी यापूर्वी जाळण्याचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात झालेली नव्हती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यावेळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी देखील केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अजय येवले याने स्थानिक युवकांनी अंगावर दुचाकी घातल्याने संतप्त होऊन पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
शासकीय रुग्णवाहिका चालूच होईना
अजय येवले याच्या प्रकृती अस्वथ्यामुळे त्याला तातडीने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्याचा निर्णय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला, त्यासाठी शासकीय रुग्णवाहिका बोलविण्यात आली, मात्र रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ती लवकर चालू झाली नाही. चालकाने खूप प्रयत्न केले, मात्र रुग्णवाहिका काही केल्या चालू होत नव्हती, त्यामुळे येवले कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळी चांगलीच संतापली होती. अखेरीस रुग्णवाहिका चालकाने शर्थीचे प्रयत्न करुन रुग्णवाहिका चालू केली आणि येवले याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले.