For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्लामाबादमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला

06:49 AM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
इस्लामाबादमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला
Advertisement

31 जणांचा मृत्यू; 169 जखमी : शुक्रवारच्या नमाजावेळी शिया मशिदीत स्फोट : राजधानीत हाहाकार

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील शिया मशिदीत (इमांबरा) शुक्रवारी नमाजादरम्यान आत्मघाती हल्ला झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार, या हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला असून 169 जण जखमी झाले. या स्फोटानंतर इस्लामाबादच्या पोलीस प्रमुखांनी शहरात आणीबाणी जाहीर केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव हे पाकिस्तानच्या दोन दिवशीय अधिकृत दौऱ्यादरम्यान असताना हा हल्ला झाला आहे.

Advertisement

इस्लामाबादमधील शुक्रवारच्या नमाजावेळी तारलाई परिसरातील इमाम बारगाह खादीजत-उल-कुब्रा येथे शक्तिशाली स्फोट झाला. स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर शहरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, फितना अल-खवारीजशी संबंधित हल्लेखोराने दरवाजाजवळ थांबल्यानंतर स्वत:ला उडवून दिले. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट आत्मघाती बॉम्बस्फोट असल्याचे दिसून येते.

स्फोटाचे स्वरूप निश्चित करणे खूप घाईचे ठरणार असून फॉरेन्सिक पथकांना हा आत्मघाती हल्ला होता की टाईमबॉम्बद्वारे स्फोट घडवण्यात आला हे निश्चित करावे लागेल, असे इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरी पोलिसांचे प्रवक्ते तकी जवाद म्हणाले. पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. या भीषण स्फोटानंतर रुग्णालयांना सतर्क ठेवण्यात आले असून जखमींना तेथे हलवण्यात आले आहे. घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालून तपास सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

स्फोटामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरल्यामुळे लोक जीव वाचवण्यासाठी पळापळ करताना दिसले. स्फोटाची माहिती मिळताच, पोलीस आणि बचाव पथके तात्काळ पोहोचली आणि मदत आणि बचावकार्य सुरू केले. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून त्यामध्ये इमाम बारगाहच्या जमिनीवर लोक बेशुद्ध पडलेले दिसत आहेत, तर काही जण एकमेकांना मदत करताना दिसत आहेत.

रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर

सुरक्षा यंत्रणांनी इमाम बारगाह आणि आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे. या हल्ल्यानंतर सर्वत्र कडक दक्षता बाळगली जात आहे. राजधानीतील पॉलीक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) आणि सीडीए हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन सेवा जाहीर करण्यात आल्या आहेत. पीआयएमएसच्या कार्यकारी संचालकांच्या सूचनेनुसार रुग्णालयात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. मुख्य आपत्कालीन, ऑर्थोपेडिक, बर्न सेंटर आणि न्यूरोलॉजी विभाग सक्रिय करण्यात आले आहेत.

हा हल्ला मानवतेच्या विरोधात : राष्ट्रपती

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. निष्पाप लोकांना लक्ष्य करणे मानवतेच्या विरोधात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. झरदारी यांनी जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतानाच त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले. अशा घटना देशाच्या स्थितीला कमकुवत करू शकत नाहीत, असेही ते पुढे म्हणाले. संसदीय कामकाज मंत्री डॉ. तारिक फजल चौधरी यांनी सोशल मीडियावर याबाबत भाष्य केले आहे. मी इस्लामाबादमधील स्फोटाचा तीव्र निषेध करतो. जीवितहानीबद्दल मला दु:ख आहे. अशा दहशतवादी घटना देश आणि तेथील लोकांच्या भावनांना कमकुवत करू शकत नाहीत. आपण सर्वांनी शांततेसाठी एकत्र येऊन कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.