पॅरा बॅडमिंटन : सुहास यथिराज, प्रमोद भगत, कृष्णा नागर अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या सुहास यथिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत थायलंडमधील पटाया येथे आयोजिण्यात आलेल्या पॅरा बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत विविध गटांतून पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला आणि पॅराऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सुहास यथिराजने पुरुष एकेरीच्या एसएल-4 वर्गाच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या लुकास मजूरचा पराभव करून महत्त्वपूर्ण धक्का नोंदविला.
या विजयामुळे यथिराज पहिल्यांदाच या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यथिराज हा कर्नाटकातील एक कुशल आयएएस अधिकारी असून सध्या तो उत्तर प्रदेशमध्ये युवक कल्याण आणि प्रांतीय रक्षक दलाचा सचिव आणि महासंचालक म्हणून जबाबदारी हाताळत आहे.
दुसऱ्या एसएल-4 उपांत्य फेरीत सुकांत कदमला इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानविऊद्ध पराभवाचा सामना करावा लागला आणि स्पर्धेतील त्याची मोहीम संपुष्टात आली. दुसरीकडे, पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत पुरुष एकेरीतील एसएल-3 वर्गाच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू मनोज सरकारविऊद्ध विजयी झाला. अंतिम फेरीत भगतचा सामना इंग्लंडच्या डॅनियल बेथेलशी होणार आहे.
पॅराऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कृष्णा नागरने एसएच-6 श्रेणीच्या अंतिम फेरीतील आपले स्थान ब्राझीलच्या व्हितोर तावारेसचा पराभव करून निश्चित केले. आता नागरचा सामना चीनच्या लिन नायलीशी होणार आहे. महिला एकेरीत एसयू-5 वर्गात मनीषा रामदासने तिचा उपांत्य फेरीतील फ्रान्सच्या मॉड लेफोर्टविरुद्धचा सामना जिंकून आगेकूच केली. तिची गाठ आता चीनच्या यांग किउ झियाशी पडेल. याशिवाय रचना शैलेशकुमार आणि नित्यश्री सुमथी सिवन यांनी एसएच 6 श्रेणीतील महिला दुहेरीत अंतिम फेरी गाठली, तर पुऊष दुहेरीत चिराग बरेथा आणि राज कुमार तसेच महिला दुहेरीत मनदीप कौर आणि मनीषा रामदास यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केले.
जरी नित्यश्री, पलक कोहली आणि मनीषा गिरीशचंद्र यांना आपापल्या उपांत्य सामन्यांत पराभव स्वीकारावा लागलेला असला, तरी त्यांनी त्यांच्या श्रेणीमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. याव्यतिरिक्त प्रमोद भगत आणि सुकांत कदम हे पुरुष दुहेरीच्या एसएल3-एसएल4 श्रेणीत मोंगखॉन बन्सून आणि सिरिपाँग टीमरोम या थायलंडच्या जोडीविऊद्ध पराभूत झाल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.