शहरातील झाडांच्या धोकादायक फांद्या हटविण्याची सूचना करा
वकिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : शहरातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या जुनाट झाडांच्या फांद्या वारा-पावसामुळे मोडून पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याच्या सूचना वनखात्याला कराव्यात, अशा मागणीचे निवेदन वकिलांच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अनुपस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. विशेष करून शहरातील किल्ला रोड, आरटीओ सर्कल ते चन्नम्मा चौक, क्लब रोड, कॉलेज रोड,काँग्रेस रोड आदी परिसरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या फांद्या मोडून पडण्याच्या स्थितीत आहेत. अशी एखादी घटना घडल्यास सरकारी तसेच खासगी मालमत्तांचे नुकसान होण्यासह नागरिकांच्या जीवाला देखील धोका आहे. त्यामुळे अशा धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याची सूचना वनखात्याला करण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अॅड. अण्णासाहेब घोरपडे, अॅड. एन. आर. लातूर, अॅड. महादेव शहापूरकर, अॅड. शरद देसाई, अॅड. मोहन नंदी, अॅड. गणेश भाविकट्टी, अॅड. विशाल उपाली, अॅड. एस. बी. मलगुरे, अॅड. स्नेहा घोरपडे यांच्यासह वकीलवर्ग उपस्थित होता.