Kolhapur News : करडवाडीत ऊसवाहतूक ट्रॅक्टर पलटी; मोटरसायकलचा चक्काचूर
तांबळे कारखान्याकडे जाणारा ट्रॅक्टर अनियंत्रित
करडवाडी : करडवाडी ( ता. भुदरगड) येथे बस थांब्यानजीक तांबळे कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ड्रायव्हरचं नियंत्रण न राहिल्यामुळे रस्त्यावरच पलटी झाल्याची घटना भर दुपारी दिडच्या सुमारास घडली. साईटला लावलेल्या मोटरसायकलवर ट्रॅक्टर दोन ट्रॉलीसह पलटी झाल्याने मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने मोटरसायकल चालक बाजूला असल्यामुळे जीवितहानी टळली.
गेल्या काही दिवसापासून कारखाना गळीत हंगाम सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढलेली आहे. परिणामी या मार्गांवरून साईट घेण्यावरून वादावादीचे प्रसंग नेहमीच घडत आहेत. यातच गारगोटी- पाटगाव मेन रोडवर एकीकडे तांबाळे कारखाना तर विरुद्ध बाजूला बिद्री, फराळे, आदी कारखान्याकडे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असून मडीलगे मधून तांबाळेकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर दोन ट्रॉली सह रस्त्यावरच पडल्याने हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल उसाच्या ट्रॉली खाली सापडल्याने गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला.
करडवाडी हे मध्यवर्ती ठिकाण प्राथमिक शाळा व हायस्कूलकडे ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच असते. मात्र दुपारच्या सुमारास रहदारी कमी असल्यामुळे जीवितहानी टळली. भरस्त्यामध्येच दोन ट्रॉल्या पलटी झाल्याने गारगोटी व कडगाव कडून येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वारंवार असे रस्त्यावर प्रकार घडत असल्यामुळे भुदरगड पोलीस ठाणे व कारखाना प्रशासनाचे साप दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवासी वर्गांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे.