सांगली जिल्हयातील राजू शेट्टींच्या आंदोलनाचा फुटबॉल! संघर्षसाठी शत्रूच निश्चित नाही
कारखानदार, शासन, प्रशासन करतेय बेदखल; ‘राजारामबापू’वरील आंदोलन दिवसा पेटले अन् रात्री विझले
युवराज निकम इस्लामपूर
माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा ऊस दराचा संघर्ष नेमका कुणाबरोबर आहे, याचाच उलगडा होईना. शासन, प्रशासन आणि साखर कारखानदार यांच्याशी त्यांची चर्चा होत आहे. प्रत्येकजण त्यांचा फुटबॉल करीत आहे. त्यामुळे यातून कसा मार्ग निघणार आणि शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार, हे अनुत्तरित आहे. शेट्टी यांचे यावेळचे आंदोलन भरकटले आहे. त्यामुळेच राजारामबापू पाटील सहकारी साखर काखान्यावरील काटा बंद आंदोलन दिवसा पेटले आणि रात्री विझले. प्रशासनाने बैठकीसाठी तीन तारखा दिल्या आहेत. या बैठकांतून तोडगा निघणार की गळीत हंगाम संपेपर्यंत झुलवत ठेवले जाणार, हेच पहावे लागणार.
शेट्टी हे ऊस आंदोलनातील मुरब्बी नेते आहेत. त्यांनी पाठीमागील काळात शासन आणि कारखानदार यांना गुडघे टेकायला लावले. पण एफआरपीचा कायदा झाल्यापासून शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची धार कमी झाली. शिवाय शेतक्रयांच्या गळ्यातील ताईत बनलेले संघटना नेते कुणाच्या ना कुणाच्या राजकीय वळचणीला गेले. कुणी खासदार झाले कुणी आमदार, मंत्री झाले. चळवळ कमी आणि राजकीय वळवळ अधिक व्हायला लागल्यानंतर त्यांची शेतकऱ्यांशी नाळ तुटली. त्यांचा शेतकरी ’आधार’ कमी झाला. चळवळीतून राजकारण साधलेले हे नेते हळूहळू दोन्हीपासून लांब गेले.
क्षेत्र कुठलेही असो, हेतू शुध्द असावा लागतो. तरच जनाधार मिळतो, अन्यथा एकाकी पडावे लागते. शेतकरी चळवळीतून पुढे आलेल्या शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची स्थिती सारखीच आहे. एकेकाळी या दोघांनी त्या-त्या वेळची सरकारे हलवली. कारण त्यांच्या आंदोलनाला दिशा होती. शत्रू निश्चित कऊन ते मैदानात उतरत होते. पण अलीकडील काही वर्षातील त्यांची आंदोलने दिशाहीन, भरकटलेली आहेत. आपला शत्रू खरा कोण आहे, हे न ठरवताच ते रणांगणात उतरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ येत आहे. सध्या शेट्टी हे ऊस दराचा तर खोत हे दूध दराचा प्रश्न घेवून उतरले आहेत. पण सरकार त्यांना बेदखल करीत आहे. आणि साखर कारखानदार त्यांना कायदा आणि सरकारच्या धोरणाकडे बोट दाखवून गप्प करीत आहे. आंदोलन व सरकारशी चर्चा यांतून खोत हे काही प्रमाणात दबावतंत्र वापरत आहेत.
एफआरपी प्लस 100 ऊपये ही सध्याची शेट्टी यांची मागणी आहे. कोल्हापूर जिह्यातील बहुतांशी कारखानदार यांनी ही मागणी मान्य केली. त्यात जिल्हाधिकारी व प्रशासनाने समन्वय घडवून आणला. पण सांगली जिह्यातील कारखानदार यांनी एकत्र येवून पहिली उचल 3100 ऊपये देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे मुख्य सूत्रधार आ.जयंत पाटील यांना ठरवून शेट्टी यांनी त्यांच्या राजारामबापू कारखान्यावर काटा बंद आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या मारल्या. ऊसाची वाहने रोखली. या आंदोलनात शेतकरी कमी आणि हौसे, गवसे, नवसे मोठ्या प्रमाणात होते. अनेकांची केवळ फोटोसाठी चढाओढ सुऊ होती. ही चढाओढ लपून राहणारी नव्हती.
कारखाना व्यवस्थापना बरोबर शेट्टी यांची बैठक झाली. पण तोडगा निघाला नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने तहसीलदार व पोलीस उपधीक्षक यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी थोडा अवधी द्यावा, जिल्हाधिकारी हे ट्रेनिंगसाठी बाहेर असल्याने बैठकीची तारीख ठरवू, अशी विनवणी करण्यात येत होती. पण शेट्टी कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासन यांच्याकडून लेखी पत्रासाठी हटून राहिले. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, म्हणून इथं आंदोलन केल्याची त्यांची भाषा होती. दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.तर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांच्यावर खापर फोडले. अखेर रात्री उशिरापर्यंत ताणून जिल्हाधिकारी यांच्या अनिश्चित तारखेवर त्यांनी आंदोलन स्थगित केले. शेट्टी यांनी अचानक नाकही सोडले आणि तोंडही सोडले. आता बैठक कधी होणार, तोडगा काय निघणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे. पण यावेळचे आंदोलन शेट्टी यांच्यासाठी अधिक जाचक ठरले आहे. त्यांचे आंदोलन सांगली जिह्यात तर दिशाहीन ठरले आहे.
शेट्टी व कार्यकर्त्यांवर गुन्हा
शुक्रवारी राजू शेट्टी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यावर केलेल्या आंदोलनातून त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. वर शेट्टी यांच्यासह त्यांच्या सुमारे दीडशे कार्यकर्त्यांवर कारखाना व्यवस्थापनाने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. सुमारे दहा तास कारखाना बंद पाडून त्यांनी नुकसान केल्याचे कारखाना प्रतिनिधी दिलीप महादेव पाटील यांनी दिलेल्या वर्दीत म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. आंदोलनातील पाठीमागील काळातील गुन्हे मागे घेताना, नाकीनऊ आले असताना,या नवीन गुह्याची भर पडली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी ऊस दर प्रश्नी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो, यांवर शेट्टी यांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.