Kolhapur : शिरोळमध्ये ऊसदराचे आंदोलन चिघळले
आंदोलकांना घेतले पोलिसांनी ताब्यात
शिरोळ : ऊसदराच्या प्रश्नी उसळलेला संघर्ष शिरोळमध्ये पेटला आहे. ऊस वाहतूक रोखण्यावरून शनिवारी 'आंदोलन अंकुश' आणि कारखाना समर्थकांमध्ये चांगलीच झटापट झाली. या धक्काबुक्कीत दोन्ही गट समोरासमोर आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करताच परिस्थिती आणखी बिघडली 'आंदोलन अंकुश'चे नेते धनाजी चुडमुंगे यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांशी कार्यकत्यांची झटापट झाली.
या झटापटीत धनाजी चुडमुंगे जखमी होऊन बेशुद्ध पडले. तर माजी आमदार उल्हास पाटील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी धनाजी चुडमुंगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना नोटीसा लागू केल्या आहेत. गेल्या १५ दिवसासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारा दर द्यावा, यासाठी आंदोलन अंकुश संघटनेचे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दत्त साखर कारखान्याशी झालेल्या बैठकीत पहिली उचल ३४०० रुपये आणि गळीत हंगाम संपल्यानंतर उर्वरित १०० रुपये देण्याचा तोडगा मान्य केला होता. याला आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी विरोध करत ऊसदर मान्य नसल्याचे सांगत आंदोलन सुरू ठेवले होते.
ट्रॅक्टर टॉलीवर चढून वाहने रोखली
शनिवारी कारखान्यांसाठी दत्त साखर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर टॉली शिरोळ येथील शिवाजी चौकात आल्यावर आंदोलन अकुंशचे कार्यकर्ते आणि कारखाना समर्थकांमध्ये वादावादी झाली. यावेळी समर्थकांनी बळाचा वापर करीत ऊस वाहने सोडली. यानंतर अंकुशचे कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर टॉलीवर चढून वाहने रोखली. यावेळी समर्थक आणि आंदोलनकर्त्यात धक्काबुक्की आणि ढकलाढकली झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
'आंदोलन अंकुश "चे धनाजी चुडमुंगे जखमी
यानंतर माजी आमदार उल्हास पाटील यांनी शेतकऱ्यांसह आंदोलनाला भेट दिली. यावेळी पोलिसांनी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापटी झाली. माजी आमदार उल्हास पाटील आणि पोलिसांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांच्या बरोबर झटापटीत धनाजी चुडमुंगे हे जखमी होऊन बेशुद्ध पडले. आंदोलनकर्त्यांनी तिथेच ठिय्या मारत कारखाना प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर जयसिंगपूर परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, निरीक्षक प्रवीण खानापुरे, उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्याने कारवाई होणार असे सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर धनाजी चुडमुंगे, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिरोळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
यावेळी बोलताना धनाजी चुडमुंगे यांनी कारखानदार दादागिरी करीत आंदोलन मोडून काढत असल्याचा आरोप केला. यावेळी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा माजी आमदार उल्हास पाटील यांनी दिला. जयसिंगपूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर यांनी धनाजी चुडमुंगे माजी आमदार उल्हास पाटील दीपक पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना नोटीसा लागू केल्या आहेत.
शेतकऱ्यांनी दाखल केला गुन्हा
शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये आठ ते नऊ शेतकऱ्यांनी आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुंगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ऊसदर प्रश्नी शिरोळमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्न तातडीने बैठक घेऊन समन्वयाने मार्ग काढून हा प्रश्न सोडवण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यातून होत आहे.