कुद्रेमनी परिसरात ऊसतोडणी हंगामाला सुरुवात
साखर कारखान्यांच्या अनेक उसतोडणी टोळ्या सक्रिय : भात-नाचणा सुगी हंगाम जोरात
वार्ताहर/कुद्रेमनी
विविध साखर कारखान्यांच्या उसतोडणी मजुरांच्या टोळ्या कुद्रेमनी गाव परिसरातील ऊस मळ्यांमधून दाखल झाल्या असून यंदाच्या उसतोडणी हंगामाला सुरुवात झाली आहे. वाहनांच्या येण्या-जाण्याची ज्या ऊस मळ्यांमध्ये सोय आहे अशा ऊस मळ्यांची उसतोडणी गतीशील झाली आहे. यंदा मोठ्याप्रमाणात पावसाचा हंगाम लांबल्याने पाणी साचून उसपिकाची वाढ खुंटली. यामुळे उस उत्पादनात घट होवून उत्पादन क्षमता दरवर्षीपेक्षा नुकसानकारक होणार असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भागातील अथर्व दौलत कारखाना अद्याप सुरू नाही. राजगोळी येथील हेमरस साखर कारखाना तसेच म्हाळुंगे येथील साखर कारखान्याच्या अनेक उसतोडणी कामगारांच्या उसतोडणी टोळ्या या भागात सक्रिय झाल्या आहेत.
मजुरांच्या तुटवड्यामुळे हंगाम साधण्यास एकमेकांची मदत
उसतोडणी करण्याबरोबरच भातपिकाची कापणी, मळणी, नाचणा कणसांची सुगी गोळा करण्याचे काम सुरू असून या भागातील शेतकरीवर्ग सुगी कामात गुंतून आहे. सुगी हंगामात मजूर माणसांचा मोठा तुटवडा असला तरी एकमेकांना मदत करून पिकांची सुगी गोळा करण्याचे काम शेतकरी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर बाहेरुन आलेले उसतोडणी मजूर स्वत:च्या लहान बालकांना उसमळ्यांच्या फडात बसवून जगण्याच्या हिमतीने काम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोट भरण्यासाठी सर्व काही सहन करावे लागतं, असे मत मजुरांतून व्यक्त होत असून यासाठी शासनाने परिस्थितीचा विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.
यंदा 3400 पेक्षा अधिक दर मिळणार काय?
लातूर, उस्मानाबाद, बीड आदी जिल्ह्यांतून आलेले उसतोडणी मजूर तसेच गावागावातील स्थानिक मजुरांकडून उसतोडणी केली जात आहे. यंदा उसाला प्रतिटन 3400 पेक्षा अधिक दर होणार की आहे तसाच राहणार, याबाबत शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे. परिसरातील पाणथळ भागातही मोठे उसमळे आहेत. पण वाटेअभावी ऊसतोडणीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.