Kolhapur : शिरोळ तालुक्यात ऊस तोड बंद; ‘आंदोलन अंकुश’ची ऊस दरावर ठाम भूमिका
ऊस दराच्या मागणीसाठी आंदोलन अंकुशचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन कायम
इचलकरंजी : शिरोळ तालुक्यात आंदोलन अंकुशचे सलग तिसऱ्या दिवशीही ऊस तोड आणि वाहतूकप्रश्नी आंदोलन झाले. जयसिंगपूर आणि उदगाव येथील ऊस तोडी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या. कारखाना प्रशासनाकडून अद्याप ऊस दराच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात आला नसल्याने यावर्षी हंगामाची सुरुवात आंदोलनानेच होईल, असे चित्र आहे.
शिरोळ येथे झालेल्या आंदोलन अंकुशच्या परिषदेत गतवर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतीटन २०० रुपये व यावर्षी तुटणाऱ्या उसाला प्रतिटन चार हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. कारखान्यांनी निर्णय दिल्याशिवाय ऊस तोडू द्यायचा नाही, असा निर्धारही करण्यात आला होता. यानंतर तालुक्यातील ऊस तोड आणि वाहतुकीवर कार्यकर्त्यांनी ठेवले आहे. पहिल्या दिवशी चिपरी येथील यड्रावकर इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारला. रात्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नोटीस लागू करून त्यांना मुक्त करण्यात आले. गतवर्षीची एफआरपी आणि यावर्षीचा अपेक्षित भाव जाहीर न करता ऊस तोडी दिल्या आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मारला. तर मंगळवारी ऊस वाहतूक रोखली. दरम्यान, जयसिंगपूर आणि उदगावमध्ये बुधवारी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी सुरू असणाऱ्या तोडी बंद पाडल्या. सकाळी काही काळ अंकली टोल नाक्यावर ठिय्या मारून ऊस वाहतुकीवर लक्ष ठेवले. १ नोव्हेंबरपासून राज्यातील ऊस गाळपाचा हंगाम सुरू होणार आहे.
या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी केली आहे. याबाबत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, गतवर्षीचे २००, यावर्षर्षीच ४००० रुपये जाहीर केल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही. शेतकऱ्यांनी थोडा संयम बाळगावा. यावर्षी उसाची मोठी टंचाई आहे. चांगला भाव हवा असेल तर तोडी घेऊ नयेत. धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, संभाजी शिंदे, बिरू पुजारी, महादेव काळे, भारत ढाले यांच्यासह कार्यकर्त्यांनी भागात दौरे करत आहेत