ट्रक डोक्यावरून गेल्याने ऊसतोडणी कामगाराच्या मुलीचा बळी
हुलीकवी शेतवडीतील घटना : ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
उसाच्या मळ्यात ट्रक मागे घेताना चाकाखाली सापडून ऊसतोडणी कामगाराच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी हुलीकवीजवळील शेतवडीत ही घटना घडली असून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
कोमल संतोष फुकसे (वय 5 वर्षे) रा. गोरेगाव, जि. हिंगोली असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. कोमलचे वडील संतोष ऊसतोडणी कामगार आहेत. बेळगाव परिसरात वेगवेगळ्या गावात ऊस तोडण्याचे काम सुरू आहे. हुलीकवी येथील चंद्राप्पा गुगरी यांच्या शेतात शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी ऊसतोडणी सुरू होती. त्यावेळी ही घटना घडली आहे. ऊस भरण्यासाठी आलेल्या ट्रकच्या पाठीमागे कोमल झोपली होती. तोडलेले ऊस ट्रकमध्ये भरण्यासाठी चालक ट्रक मागे घेत होता. त्यावेळी या बालिकेच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. यासंबंधी ट्रकचालक कैलासराम ऊर्फ रामराव चांदणे, रा. सासोरा, जि. बीड याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.