Kolhapur News : टेंभुर्णीजवळ केमिकल टँकरच्या धडकेत ऊसतोड कामगार कुटुंब ठार
पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात;
टेंभुर्णी : पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरकडे निघालेल्या केमिकल टँकरने दुचाकीस ठोकरल्याने ऊसतोड कामगार, त्याची पत्नी व मुलीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.
तिन्ही मृत हे ऊसतोड कामगार असून ते कोटबंधनी (पोस्ट रायपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील रहिवासी आहेत. मीरा राज्य भील (वय ३८), खारकी मीरा भिल (वय २६) व पायल मीरा भील (वय १५, सर्व रा. कोटबंधनी, पोस्ट रायपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी मृतांची नावे आहेत.
४ जानेवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर हे तिघेजण शाईन दुचाकीवरून सोलापूरच्या दिशेने जात होते. त्यांची दुचाकी पंढरपूर रोडवरून पुणे-सोलापूर हायवेकडे वेणेगाव येथील बोगद्यातून वळून जात असताना पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने मागून भरधाव वेगाने आलेल्या केमिकल टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी, त्यांची मुलगी असे तिघे ऊसतोड कामगार यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हे ऊसतोड कामगार पंढरपूर तालुक्यात ऊसतोडणीचे काम करीत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, ते भल्या पहाटे नेमके कुठे निघाले होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
अपघातानंतर जखमी झालेल्यांना बरबडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेमधून गस्ती पथकाच्या मदतीने टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच बरवडे टोल प्लाझा येथील गस्तीपथक व टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील कर्मचारी, घटनास्थळी दाखल झाले.