Kolhapur : राजापूर परिसरात उसाला आग; 12 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
राजापूर शिवारात उसाच्या शेतात भीषण आग
कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील राजापूर परिसरात उसाला लागणाऱ्या आगीचे सत्र सुरूच असून, पुन्हा एकदा आगीच्या तांडवाने सुमारे १२ एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना राजापूरवाडी रस्त्यालागत गट क्र. ४१८ ते २४३ या शिवारात घडली.
दुपारी एकच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना अचानक आग लागली. काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि शेजारील शेतांपर्यंत पसरली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत गट क्रमांक २४३ मधील शहाजहान जमादार, २२१ मधील महादेव चौगुले, आनगोंडा पाटील, ४२० मधील गुराप्पा कुंभार, ४१९ मधील नीगोंडा पाटील, शकुंतला कलगोडा पाटील तसेच ४१८ मधील घुणके यांच्या ऊसपिकांचे मोठे नुकसान झाले.
आगीमध्ये जळालेला ऊस आडसाली हंगामातील असून तोडणीस सज्ज होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. शेतकरी गुराप्पा कुंभार, आडसाली ऊस लावण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची आणि तोडणीला आला की आगीचा तांडव पाहायचा, अशा परिस्थितीत अन्नदाता शेतकरी कसा टिकणार, सरकारने तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सुमारे सात एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला होता. त्यानंतर अल्पावधीतच पुन्हा ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.