कारलगा येथे उसाच्या फडाला आग; शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
आग विझविण्याच्या प्रयत्नात उसाच्या फडात कोसळल्याने दुर्घटना
खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा येथे उसाला लागलेल्या आगीच्या भडक्यात शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या दरम्यान घडली. तुकाराम रवळू पवार (वय 75) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कारलगा-चापगाव रस्त्याच्या शेजारी तुकाराम पवार यांची उसाची शेती आहे. उसाच्या बियाणांसाठी काही ऊस ठेवण्यात आला होता. तोडलेल्या उसाच्या चिपाडाला गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या दरम्यान आग लागली. तुकाराम पवार हे बियाणासाठी ठेवलेल्या उसाला आग लागू नये, म्हणून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वाऱ्याच्या झोतामुळे मोठा भडका उडाला. तोडलेल्या उसाच्या चिपाडाने पेट घेतला.
आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना ते उसाच्या फडात तोल जाऊन कोसळल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. शेजारी काम करत असलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी लागलीच आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आली. नंदगड पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी इस्पितळात हलविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दवाखान्यात भेट देऊन तातडीने उत्तरीय तपासणी करण्यात यावी, अशी सूचना डॉक्टरांना केली. ज्येष्ठ नागरिक तुकाराम पवार यांच्या अपघाती मृत्युमुळे कारलगा, लालवाडी, नावगा, हेब्बाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तुकाराम पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून असा परिवार आहे.