For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ऊस उत्पादक रस्त्यावर...सरकार फाट्यावर !

06:30 AM Oct 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऊस उत्पादक रस्त्यावर   सरकार फाट्यावर
Advertisement

शेतकरी आंदोलनाने केवळ दोन दिवसात यंत्रणेला घाम फोडला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार झाला नाही तर हे आंदोलन चिघळण्याची शक्यताच अधिक आहे. साखर कारखाने आज केवळ कारखाने राहिले नाहीत. ते सत्ताकेंद्रेही आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाने चालविण्याचे सांगत साखर कारखान्यावर भलेमोठे कर्ज काढून ते बुडविणाऱ्या कारखानदारांची संख्याही काही कमी नाही. यापूर्वीचे शेतकरी नेते कै. नंजुडस्वामी, माजी केंद्रीय मंत्री कै. बाबागौडा पाटील यांची आंदोलनेही अशाच पद्धतीने चालायची. आता त्याच पद्धतीने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.

Advertisement

बेळगावसह कर्नाटकातील तेरा जिल्ह्यात ऊसदर आंदोलन भडकले आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडी, हत्तरगी, कोगनोळी टोलनाके दोन दिवस बंद होते. शेतकऱ्यांनी महामार्गावर निदर्शने करून केंद्र सरकारविरुद्ध आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. गेल्या सोमवारी 12 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे शेतकरी नेते, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी व शिवराजसिंग चौहान यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काही तरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. कोणत्याच निर्णयाशिवाय बैठक आटोपती घेण्यात आली. दुसऱ्याच दिवशी मंगळवारपासून शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केला आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत केंद्र सरकारकडून ठोस निर्णय जाहीर होणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगली होती. ती अपेक्षाही फोल ठरली. दोन दिवस महामार्ग रोखल्यामुळे प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसला. शेवटी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी हुबळीच्या दिशेने कूच सुरू ठेवली आहे. शेतकरी संघटनेचे नेते शशिकांत गुरुजी, चुन्नाप्पा पुजारी आदींनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असे जाहीर केले आहे. उसाला प्रतिटन 5,500 रुपये दर ठरवावा, साखरेला प्रतिकिलो 60 रुपये आधारभूत किंमत ठरवावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणाव्यात, राज्यात उत्पादित होणारे इथेनॉल खरेदी करावे, शेतकऱ्यांच्या पिकांना वैज्ञानिक पद्धतीने आधारभूत किंमत ठरवावी, एकरी 25 हजार रुपये दुष्काळामुळे भरपाई द्यावी, या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.

Advertisement

प्रतिटन 5,500 रुपयेचा दर कारखानदारांना परवडत नाही. वेळोवेळी कारखानदारांनीही ही गोष्ट स्पष्ट केली आहे. कारखाने अडचणीत आहेत, त्यामुळे शेतकरी मागतील तो दर देता येत नाही, असे सांगितले जात असले तरी दरवर्षी नव्या कारखान्यांसाठी सरकारकडे येणाऱ्या अर्जांची संख्याही काही कमी नाही. साखर कारखाने किंवा साखर व्यवसाय अडचणीत असेल तर नव्या कारखान्यांसाठी स्पर्धा कशासाठी सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साखर, मळी, इथेनॉल, वीज उत्पादन करूनही साखर व्यवसाय संकटात आहे, अशी हाकाटी कारखानदारांकडून करण्यात येते. गेल्या वर्षी शशिकांत गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली गोकाक तालुक्यातील गुर्लापूर येथे मोठ्या प्रमाणात ऊसदर आंदोलन झाले. त्याचा पुढचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन छेडले आहे.

राज्य सरकार म्हणते, ऊसदर ठरविण्याचा अधिकार केंद्राला आहे. केंद्र सरकार म्हणते तुम्ही राज्याबरोबर चर्चा करा! दोन्ही सरकारांनी आपली जबाबदारी झटकली तर आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा प्रश्न शशिकांत गुरुजी यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानासमोर शेतकऱ्यांनी धरणे धरल्यानंतर दिल्लीची बैठक ठरली होती. ठरल्याप्रमाणे 12 ऑक्टोबरला ही बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. म्हणून आधीच ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीपासूनच शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आता हुबळीला धडक देण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी आंदोलनाला कमी लेखू नये. सोमवारच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ऊसउत्पादक शेतकरी व साखर व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संयुक्त समितीची स्थापना झाली आहे.

शेतकरी नेत्यांना मात्र हे मान्य नाही. पावसाअभावी दुष्काळ पडला आहे. उभे पीक वाळत चालले आहे. नद्यांचे पाणीही आटत आहे. धरणातील पाणीसाठा घटत आहे. उपलब्ध पाणी उन्हाळ्यात वापरण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा परिस्थितीत पीक सांभाळणे कठीण जात आहे. तुम्ही समिती स्थापन करून त्यांचा अहवाल येईपर्यंत आहे ते पीकही वाळून जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या काही गैर नाहीत. किमान प्रतिटन 5,500 रुपये व एक किलो साखरेला 60 रुपये किमान आधारभूत किंमत देण्यासंबंधीची तरी केंद्राने घोषणा करावी तर आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी मांडली आहे. ऊसउत्पादनासाठीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. ऊसदर मात्र वर्षानुवर्षे आहे तोच आहे. शेतकरी व साखर कारखाने दोन्ही टिकले पाहिजेत. या व्यवस्थेत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे कर्नाटकाचे साखरमंत्री रुद्राप्पा लमाणी यांनी सांगितले आहे. कारखानदारांकडून होणाऱ्या काटामारीची चर्चा प्रत्येक हंगामात होतेच. ती रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची आश्वासने दिली जातात. प्रत्यक्ष कृती केली जात नाही. ऊसदराचा विषय आला की सर्वपक्षीय नेते एकत्र येतात. कारण, साखर कारखानदार साऱ्याच पक्षात आहेत.

शेतकरी आंदोलनाने केवळ दोन दिवसात यंत्रणेला घाम फोडला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार झाला नाही तर हे आंदोलन चिघळण्याची शक्यताच अधिक आहे. साखर कारखाने आज केवळ कारखाने राहिले नाहीत. ते सत्ताकेंद्रेही आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाने चालविण्याचे सांगत साखर कारखान्यावर भलेमोठे कर्ज काढून ते बुडविणाऱ्या कारखानदारांची संख्याही काही कमी नाही. यापूर्वीचे शेतकरी नेते कै. नंजुडस्वामी, माजी केंद्रीय मंत्री कै. बाबागौडा पाटील यांची आंदोलनेही अशाच पद्धतीने चालायची. आता त्याच पद्धतीने होणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक व्यापक होत जात आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आदीतही आपण पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी बळीराजा रस्त्यावर उतरला आहे. कर्नाटकात शेतकरी आंदोलनापेक्षाही राजकीय नेत्यांच्या स्टींग ऑपरेशनच्या चर्चेने उचल खाल्ली आहे.

रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.