सातवे परिसरात ऊस तोडणी बंद; स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक
वारणानगर प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील सातवे परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ऊस तोडी बंद पाडल्या आहेत.वारणा सहकारी साखर कारखान्याचे सातवेतील तर दत्त दालमिया भारत शुगर चे बोरपाडळे येथील शेती कार्यालयास काही काळ शेतकरी संघटनेच्या वतीने कुलूप लावण्यात आले.वारणा कारखान्याचे सातवेतील कार्यालय येथे चर्चेला गट अधिकारी व कर्मचारी आले नाहीत या कारणास्तव कुलूप लावत असताना संबंधित कर्मचारी पोहचले. त्यांनी कुलूप लावण्यास रोखले काही काळ तणाव निर्माण झाला तथापी चर्चेने मार्ग काढण्यात आला आहे.
बोरपाडळे येथील परिस्थिती निवळली असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. डोईजड यानी सांगितले.सातवे परीसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रँली काढून शेतकऱ्यांनी ऊस तोड घेवू नये असे आवाहन करण्यात आले त्यास चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे आज गुरुवार दि. १६ रोजी परिसरात सर्व ऊस तोड बंद होत्या. स्वच्छेने जे शेतकरी ऊस तोडी देत आहेत त्यांचे साखर कारखाने ऊस नेत आहेत. तथापी शेतकऱ्यांनी ऊस तोडी स्वीकारू नयेत असे आवाहन संघटनेने केले आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विजय सावंत,रंगराव शिपुगडे ,वसंत वरपे, दादा आंब्रे, सचिन गायकवाड, रमेश निकम, विक्रम शिपुगडे, पिंटू गोंधळी ,घनश्याम पाटोळे, भाऊसो निकम, तसेच संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.