साखर उत्पादन 2.48 टक्क्यांनी घटले
15 फेब्रुवारीपर्यंत चालू विपणन वर्षातील उत्पादनाचा समावेश : इस्माच्या आकडेवारीतून माहिती समोर
नवी दिल्ली :
चालू विपणन वर्ष 2023-24 मध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत देशातील साखरेचे उत्पादन 2.48 टक्क्यांनी घटून 22.36 दशलक्ष टन झाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते 22.93 दशलक्ष टन होते. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर पर्यंत चालते. औद्योगिक संस्था इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) च्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू 2023-24 विपणन वर्षात साखर उत्पादन 10 टक्क्यांनी घसरून 33.05 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे, मागील वर्षी 36.62 दशलक्ष टन होते.
इस्माच्या मते, चालू विपणन वर्षात 15 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये साखरेचे उत्पादन कमी राहिले. तथापि, उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या याच कालावधीत 61.2 लाख टनांच्या तुलनेत वाढून 67.7 लाख टन झाले.
चालू विपणन वर्षात 15 फेब्रुवारीपर्यंत देशात सुमारे 505 कारखाने कार्यरत होते, तर वर्षापूर्वीच्या कालावधीत ही संख्या 502 होती. इस्माने सांगितले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे 22 कारखान्यांनी त्यांचे कामकाज बंद केले आहे.