काय व्हायचं ते होऊ दे...उद्या चक्काजाम होणारचं...! दिल्लीतील शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन चालवू; राजू शेट्टींची घोषणा
अभिजीत खांडेकर
गेल्या दिडएक महीन्यांपासून सुरु असलेल्या उसदर आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज चौथी बैठक पार पडली. आम्ही एक नव्हे तीन पाऊले मागे आलो आहोत तरीही साखर कारखानदारांनी आपला हट्टीपणा सोडला नसल्याचा आरोप आंदोलनाचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या उपस्थितीत झालेली बैठक पुन्हा एकदा फिस्कटली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्याचं खापर साखर कारखानदारांवर फोडलं आहे.
बैठकीनंतर आक्रमक झालेल्या राजू शेट्टी यांनी आम्ही नरमाईची भुमिका घेतली असताना साखर कारखानदार संघटनेला जुमानत नसल्याचा आरोप केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आम्ही जी काही मागणी करत आहे ती जगावेगळी नाही. आम्ही गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला जादा पैसे मागतो आहोत. 400 ची जरी मागणी असली तरी त्यात मागेपुढे काहीतरी होईल. पण साखर कारखानदारांनी हे पैसे दिलेच पाहीजेत. 400 रूपयांची मागणी सोडून 100 रुपयांवर आलेलो आहोत आता यामध्ये 1 रूपया पण कमी होणार नाही. तेव्हडं द्यावच लागेल त्याशिवाय कारखाने सुरु होणार नाहीत."असा इशारा त्यांनी दिला.
पुढे बोलताना त्यांनी "मागील चार- पाच वर्षामध्ये साखर कारखाने अडचणीत असताना आम्ही संयम राखला आहे. त्यांना समजून घेतले आहे. आता मात्र आम्ही त्यांच्याकडे पैसे असताना गप्प बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही उद्यााचा चक्काजाम आंदोलन होणारच. जर आज 8 वाजेपर्यंच कारखानदारांनी आपला दर जाहीर केला तर आम्ही आंदोलन मागे घेण्याचा विचार करू."
"आम्ही एक नव्हे तीन पाऊले मागे आलेलो आहोत. पण तरीही साखर कारखानदार याला जुमानत नसतील तर एकदा काय व्हायचं ते होऊ दे अशी आमची भुमिका राहील. ज्यापद्धतीने शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये एक वर्ष आंदोलन केलं होतं. त्याच धरतीवर आम्ही उद्याचं आंदोलन बेमुदत करून आमची संख्या हीच आमची ताकद आहे. त्यामुळे सरकारला आमच्या मागण्या मान्य करायला लावू."
"कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हेच शेतकऱ्यांच्या कारखाना चालु करण्याच्या मागणीच्या आंदोलनामागे आहेत. त्याच प्रमाणे सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील आणि विश्वजित कदम हे सुद्धा सामिल आहेत. जे देत आहेत त्या कारखान्यावर इतरांचा दबाव असून जे देणार आहेत त्यांना आजपासून कारखाने चालू करण्यास कोणीही रोखणार नाही."
"शिरोळमध्ये जो काही मोर्चा झाला त्यातील बरेच जवाहर, शरद आणि दत्त कारखान्याचे कामगार आहेत. आजपर्यत शेतकऱ्यांनी कधीही कामगारांविरोधात भुमिका घेतली नव्हती. आम्ही कधीही उसतोड मजूरांनी जादा पगार मागीतल्याने आंदोलन केले नाही. वाहतूकदराविरोधात भुमिका घेतली नाही. आज कारखानदारांच्या दबावामुळे कामगार शेतकऱ्यांच्या विरोधात भुमिका घेत आहेत ही दुर्दैवी बाब आहे. कारखान्याच्या कामगार चळवळीने याचा विचार करावा."असेही त्यांनी म्हटले आहे.