सुदीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धा 27 एप्रिलपासून
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनमधील झियामेन येथे 27 एप्रिल ते 4 मे दरम्यान होणाऱ्या सुदीरमन चषक फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय बॅडमिंटन संघाचे नेतृत्व दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन करणार आहेत. मंगळवारी या स्पर्धेसाठी 14 जणांचा भारतीय बॅडमिंटन संघ घोषित करण्यात आला.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनची ही प्रतिष्ठेची मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी सर्वंकश विश्व मानांकनाच्या जोरावर भारतीय संघ पात्र ठरला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा ड गटात समावेश असून या गटात माजी विजेता इंडोनेशिया, डेन्मार्क आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. दुखापतीनंतर या स्पर्धेसाठी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. मात्र भारताची महिला दुहेरीची अव्वल जोडी गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली दुखापती समस्येमुळे सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या गैरहजेरीत महिला दुहेरीत के. प्रिया आणि श्रुती मिश्रा भारताचे प्रतिनिधीत्व करतील. पुरूष दुहेरीमध्ये सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी तसेच ए. हरिहरण आणि रुबेनकुमार सहभागी होत आहेत. पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय, महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू, अनुपमा उपाध्याय तसेच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांनी मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.