आयआयटी गोवा कॅम्पस आणि मलनिस्सारण प्रकल्पाला ग्रामस्थांनी सहकार्य करावे : वीजमंत्री सुदिन ढवळीकर; बांदोडा पंचायतीच्या नूतनीकृत सभागृहाचे उद्घाटन
‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ योजनेंतर्गत बांदोडा पंचायतीला उपलब्ध झालेल्या 50 लाख रुपयांच्या निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या सुसज्ज पंचायत सभागृहाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते झाले. बांदोडा पंचायत कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर हे सभागृह उभारण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
मडकई मतदारसंघातील पंचायतींनी गावांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन कचरा व्यवस्थापन प्रकल्प, क्रीडांगणे आणि इतर लोकोपयोगी सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही ढवळीकर यांनी केले. केवळ विकासकामांना विरोध करण्यापेक्षा त्यातून गावाला आणि नागरिकांना होणारा दीर्घकालीन फायदा लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंचायत सभागृहावर सौरऊर्जा पॅनेल बसविणार
बांदोडा पंचायतीच्या नूतनीकृत सभागृहावर लवकरच सौरऊर्जा पॅनेल बसविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ढवळीकर यांनी केली. सौरऊर्जेच्या वापरामुळे हरितऊर्जेला प्रोत्साहन मिळण्यासोबतच विजेवरील खर्च कमी करण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत राज्यातील 18 पंचायतींमध्ये सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
भविष्यात एक कोटींची विकासकामे
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक यांनी बांदोडा पंचायत क्षेत्रात भविष्यात सुमारे एक कोटी रुपयांची विकासकामे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. पंचायत ही ग्रामस्थांसाठी हक्काची आणि महत्त्वाची संस्था असून, पंचायत सभागृह हे नागरिकांच्या विविध उपक्रमांचे केंद्र असते. त्यामुळे अशा सभागृहांचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे मत मिथील ढवळीकर यांनी व्यक्त केले. गटविकास अधिकारी अश्विन देसाई यांनीही यावेळी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडाच्या सरपंच चित्रा फडते, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्वस्त मिथील ढवळीकर, गटविकास अधिकारी अश्विन देसाई, वाडी-तळावलीच्या सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर, फोंड्याच्या नगरसेविका गीताली तळावलीकर, वेदिका वळवईकर, बांधकाम खात्याचे अभियंता नरेश हेदे, नंदा कामत, पंचायत सचिव कृष्णा गावडे तसेच बांदोडा पंचायतीचे पंचसदस्य उपस्थित होते. सरपंच चित्रा फडते यांनी स्वागत केले.
विद्यार्थी, शिक्षक आणि तीन देवस्थानांचा गौरव
या कार्यक्रमाचे औचित्य साधून बांदोडा पंचायत क्षेत्रातील राजमाता सौदेकर हायस्कूल आणि गावणे येथील महात्मा गांधी सेंटेनरी हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच दोन्ही शाळांतील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
पंचायत सभागृहाच्या नूतनीकरणासाठी सहकार्य केल्याबद्दल श्री रामनाथ देवस्थान, श्री महालक्ष्मी देवस्थान आणि श्री नागेश देवस्थान यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तिन्ही देवस्थानांच्या अध्यक्षांनी हा सन्मान स्वीकारला. याशिवाय कटमगाळ दादा महाराज भजनी मंडळ, सेवा संकल्प आश्रम आणि धेंपो शिपबिल्डिंग या संस्थांचा तसेच कंत्राटदार विशाल दुर्भाटकर आणि सिद्धार्थ कामत यांचाही गौरव करण्यात आला.
सत्कारमूर्तींच्या वतीने डॉ. अनिता तिळवे, हर्षद कामत आणि संजय प्रियोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. गावाच्या विकासात पंचायत, ग्रामस्थ, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
