तापमानात अचानक उतार-चढाव आरोग्यासाठी धोकादायक
नियंत्रणहिन उत्सर्जनाने वाढणार धोका
जगभरात हवामान बदलाचा प्रभाव आता केवळ तापमानवाढीपुरती मर्यादित राहिलेला नाही, तर आता हवामानात वेगाने होणारा अचानक बदल याच्या नव्या स्वरुपात समोर येत आहे. तापमानात अचानक मोठा उतार-चढाव आता जगासमोर एक नवे आव्हान म्हणून उभे ठाकत आहे. 1961-2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार आधारित एका जागतिक अध्ययनातून मागील 6 दशकांमध्ये पृथ्वीच्या 60 टक्क्यांहून अधिक हिस्स्यांमध्ये उन्हाळा आणि हिवाळ्यादरम्यान तापमानात अचानक उतार-चढाव होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. चीन, अमेरिका आणि कॅनडाच्या विविध संशोधन संस्थांच्या वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या अध्ययनानुसार तापमानात अचानक मोटा बदल ज्याला वैज्ञानिकांनी ‘रॅपिड टेम्परेचर फ्लिप्स’ संबोधिले आहे, ते केवळ मानवी आरोग्यासाठी नव्हे तर कृषी आणि इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांसाठी गंभीर धोका ठरत आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिक नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित या अध्ययनात एक इशाराही देण्यात आला आहे. जागतिक तापमानवाढीला नियंत्रित न करण्यात आलयास शतकाच्या अखेरपर्यंत अशाप्रकारच्या हवामानाच्या झटक्यांचे प्रमाण आणि तीव्रता विशेषकरून विकसनशील आणि दुर्बल देशांमध्ये अत्यंत अधिक वाढणार असल्याचे म्हटले गेले आहे.
कृषिचक्रात होऊ शकतो बिघाड
वैज्ञानिकांनुसार तापमान काही काळात अत्याधिक उष्णतेपासून थंडीत बदलते, तेव्हा जीवजंतू आणि मनुष्यांसाठी अनुकूलन करणे अत्यंत कठिण ठरते. यामुळे कृषिचक्र बिघडून जाते, हिमवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते आणि आरोग्य जोखीम म्हणजेच हीट स्ट्रोक किंवा हायपोथर्मिया वाढू शकतो. उदाहरणार्थ मार्च 2012 मध्ये उत्तर अमेरिकेत तापमान सरासरीपेक्षा 10 अंशाने वाढले होते, तर काही दिवसांतच हे तापमान 5 अंशांनी कमी झाले होते.
भविष्यासाठी इशारा
वैज्ञानिकांनी विविध हवामान स्थितींचे विश्लेषण करत भविष्याचे एक भयावह चित्र सादर केले आहे. जर ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन वेगाने वाढत राहिले (एसएसपी 5-8.5 किंवा एसएसपी 3-7.0 सारख्या उच्च उत्सर्जन स्थितींमध्ये) तर शतकाच्या अखेरपर्यंत तापमानात अचानक बदलाच्या घटना दुप्पटीपेक्षा अधिक होऊ शकतात. यामुळे खासकरून आफ्रिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण अमेरिका यासारख्या क्षेत्रांमध्ये लाखो लोक हवामान आपत्तींच्या धोक्याच्या कक्षेत येऊ शकतात. या क्षेत्रांमध्ये तापमानाच्या झटक्यांमुळे प्रभावित होण्याची जोखीम जागतिक सरासरीपेक्षा 4 ते 6 पट अधिक असू शकते.