स्वराज कौशल यांचे अकस्मात निधन
बांसुरी स्वराज यांचे वडील : सुषमा स्वराज यांचे पती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मिझोरमचे माजी राज्यपाल आणि देशातील सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक स्वराज कौशल यांचे गुरुवारी अकस्मात निधन झाले. ते दिवंगत माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील होत. निधनसमयी ते 73 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 12 जुलै 1952 रोजी हिमाचल प्रदेशातील सोलन येथे झाला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 4:30 वाजता नवी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी नातेवाईकांसह भाजपचे नेते उपस्थित होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत बांसुरी स्वराज यांचे सांत्वन केले.
स्वराज कौशल यांनी मिझोरमचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एका ‘एक्स’ पोस्टमध्ये भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. ‘मिझोरमचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ वकील श्री. स्वराज कौशलजी यांच्या निधनाची बातमी दु:खद आहे. त्यांचे सार्वजनिक जीवन आणि कायद्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान नेहमीच लक्षात राहील. राष्ट्र आणि समाजासाठी त्यांनी केलेली सेवा अविस्मरणीय आहे. या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांच्या दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो. ओम शांती.’ असे ट्विट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.