माजी सैनिक नामदेव सावंत यांचे आकस्मिक निधन
ओटवणे प्रतिनिधी
भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार तथा जिल्हा समायोजन कार्यालयातील मुख्य लिपिक नामदेव रामचंद्र सावंत (५३) यांचे गुरुवारी दुपारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाचा सावंत कुटुंबीयांसह आजी - माजी सैनिक परिवार व सर्वांनाच धक्का बसला. मूळचे दाणोली गावठण येथील नामदेव सावंत यांनी भारतीय सैन्य दलात विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर ते ओरोस येथे जिल्हा समायोजन कार्यालयात मुख्य लिपिक होते. नामदेव सावंत यांच्या कुटुंबाला सैनिकी परंपरा असून त्यांचे काका तसेच भाऊ भारतीय सैन्य दलात होते. सेवाभावी वृत्तीचे नामदेव सावंत गोरगरीब विद्यार्थ्यांसह गरजूंना ते नेहमीच मदत करीत. ते सावंतवाडीत राहत असत. गुरुवारी दुपारी ते सावंतवाडी बस स्थानकाच्या बाथरूम मध्ये गेले असता हृदयविकाराच्या धक्क्याने ते खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मनोज राऊत आणि दीपक शिंदे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व दाणोली पंचक्रोशीवासीयांनीही सावंतवाडीत धाव घेतली. त्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईस्थित माजी सैनिक सुरभा सावंत आणि प्रभाकर सावंत यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ भावजय, बहिणी, पुतणे असा परिवार आहे.