सुदर्शनची 168 धावांची खेळी
इंडिया अ चा श्रीलंकेविरुद्ध 541 धावांचा डोंगर
वृत्तसंस्था, गॅले
शनिवारी दुसऱ्या अनधिकृत कसोटीत पावसाचा व्यत्यय आलेल्या तिसऱ्या दिवशी, साई सुदर्शनची बहारदार 168 धावांची खेळी आणि मधल्या व तळाच्या फळीतील फलंदाजांच्या उत्प़ृष्ट कामगिरीमुळे इंडिया अ ने 8 बाद 541 धावांची भक्कम मजल मारली. सामन्याचा एक दिवस बाकी असताना इंडिया अ कडे आता 175 धावांची आघाडी आहे. दिवसाची सुरुवात 104 धावांवरुन करणाऱ्या सुदर्शनने आपली खेळी पुढे चालु ठेवली आणि मोठी शतकी खेळी (168 धावा, 267 चेंडू, 22 चौकार) साकारली. तत्पूर्वी, देवदत्त पडिकल त्याच्या आदल्या दिवसाच्या 94 धावांच्या धावसंख्येवर बाद झाला. देवदत्त पहिल्याच षटकात बाद झाल्यामुळे भारताची धावसंख्या 2 बाद 248 अशी झाली होती. परंतु सुदर्शनला कर्णधार ध्रुव जुरेलने 88 चेंडूत 53 धावा करत चांगली चाथ दिली.
गायकवाड दुखापतीमुळे मैदानाबाहेर
सुदर्शन आणि जुरेल यांची जोडी जमण्यापूर्वी भारताला एका चिंतेच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. वेगवान गोलंदाज असंका मनोजचा चेंडू हेल्मेटवर आदळल्यामुळे ऋतुराज गायकवाडला 13 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत जावे लागले. तरीही या दोन कुशल खेळाडूंनी भारताला त्या कठीण प्रसंगातून सावरले. मात्र गायकवाड रविवारी फलंदाजीसाठी उतरू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सुदर्शन आणि जुरेल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 120 धावांची भागीदारी करत यजमान संघाला आणखी यश मिळवण्यापासून रोखले आणि इंडिया अ चे वर्चस्व कायम राखले. सुदर्शनकडे द्विशतक करण्याची संधी होती, परंतु डावखुरा फिरकी गोलंदाज दिलुम सुदिरा याने त्याला पायचीत बाद केले. त्यानंतर जुरेलही जास्त काळ टिकू शकला नाही. यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या जुरेललाही सुदिराने पायचीत केले. तसेच शेख रशीदने 51 चेंडूत जलद 45 धावा केल्या. पण ऑफ स्पिनर केशरा नुवान्थाच्या गोलंदाजीवर तोही पायचीत झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या 5 बाद 454 अशी होती आणि ते 84 धावांची आघाडीवर होते. पाहुण्या संघालाही आघाडी आणखी वाढवण्याची गरज होती.
चहापानानंतर पावसामुळे खेळ जवळपास तासभर थांबला होता. त्यानंतर सारांश जैन नाबाद 68 आणि आकिब नबी 30 यानी सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागिदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. दिवसाच्या खेळाच्या अगदी शेवटी, मनोजने डीपमध्ये झेल घेतल्यामुळे तो पार्ट टाइम फिरकी गोलंदाज सहन अराचिगेचा बळी ठरला. मात्र तोपर्यंत इंडिया अ संघाने चांगली आघाडी घेतली होती.
संक्षिप्त धावफलक श्रीलंका अ : सर्वबाद 366 , इंडिया अ 142 षटकांत 8 बाद 541 (साई सुदर्शन 168, देवदत्त पडिकल 94, ध्रुव जुरेल 53, सारांश जैन नाबाद 68, केशरा नुवान्था 4-158, दिलुम सुदिरा 3-101).