सुची सेमिकॉनची 10 कोटी डॉलर गुंतविण्याची योजना
सुरतमध्ये नवीन सेमिकंडक्टर प्रकल्प नोव्हेंबरला होणार सुरु
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सुची सेमिकॉन ही कंपनी 10 कोटी डॉलर गुंतवणूक करणार आहे. यामध्ये सूरतमधील नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. सुरत-आधारित सेमीकंडक्टर उत्पादक सुची सेमिकॉनने सांगितले की, त्यांनी पुढील 3-5 वर्षांमध्ये त्यांच्या आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्टिंग प्लांटवर 10 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. गुजरातच्या सुरत जिह्यात सुमारे 30,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर असलेल्या या नवीन प्रकल्पामध्ये प्रतिदिन 30 लाख चिप्सची क्षमता असणार आहे.
कंपनीला गुजरात राज्य सेमीकंडक्टर धोरणांतर्गत प्लांटसाठी मंजुरी मिळाली आहे आणि भारताने सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आपला प्रस्ताव सादर केला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवसापासून प्लांटची क्षमता दररोज 2 लाख उत्पादनांची असेल, असे सुची सेमिकॉनच्या सह-संस्थापक शीतल मेहता यांनी सांगितले. सध्याच्या काळात, कंपनीने ओएसएटी प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि भविष्यात ते सेमीकंडक्टर डिझाइनिंगमध्ये प्रवेश करू शकते. ‘आम्हाला ओएसएटी ऑपरेशन्सवर चिंतन करायला आवडेल आणि डिझाईन ही भारताची मजबूत बाजू असल्याने आम्ही डिझाइनिंगमध्येही सहभागी होऊ असेही ते म्हणाले आहेत.