ऐसिया संपत्ती आम्हां संवसारी ।
नाती टिकवण्यासाठी, जपण्यासाठी फार काही करावे लागते असे नाही. पण, निर्माण करावा लागतो परस्परात विश्वास आणि मात करावी लागते भेदबुद्धीवर. त्यासाठी मन निर्मळ आणि आपुलकीच्या भावनेने भरलेले असावे लागते. उसना आव टिकत नाही. नाती जपताना चार पाऊले पुढे किंवा दोन पाऊले मागेही जावे लागते. आपल्या माणसांच्या हिताचा विचार करावा लागतो. त्यातून इतरांच्याच नव्हे तर आपल्याही आयुष्यात सुख, समाधान कायम राहते. प्रसंगी आपल्या माणसांच्या हितासाठी झीज देखील सोसावी लागते. पण, या सगळ्या आपलेपणावर मात करणारी एखादी घटना समाजासमोर येते आणि नात्यातील दुरावा झटक्यात वाढीला लागतो. अशीच एक घटना घडली आहे पिंपरी चिंचवड येथे. तसे तर त्या घटनेला वृत्तपत्राच्या एका कोपऱ्यात देखील जागा मिळाली नसती. मात्र सर्वत्र ती चर्चेत आली आहे ते प्रकरण पोलिसात गुन्हा दाखल होण्यापर्यंत पोहोचले म्हणून. कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास होत असल्याच्या घटना काही नव्या नाहीत. मात्र पोलीस ठाण्यात गेलेली ही घटना घडली ती ब्रेनडेड झालेल्या पित्याची मृत्यूशी झुंज सुरू असताना. वडिलांच्या नावाने बनावट मृत्युपत्र बनवून तीन मुलींनी त्यावर त्यांच्या अंगठ्याचे चोरून ठसे घेत आपल्या नात्याला काळीमा फासला म्हणून. विवाहित असलेल्या तीन मुलींनी मालमत्तेच्या हव्यासापोटी माणुसकीला लाजवणारे हे कृत्य केले. वडील ज्या दवाखान्यात उपचार घेत होते आणि आपल्या मुली काय करत आहे हे समजणेही त्यांना जेव्हा शक्य नव्हते त्यावेळी त्यांनी ही कृती केली. पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या एका 65 वर्षी व्यक्तीला एकाच वेळी कर्करोग आणि हृदयरोगाने ग्रासले. त्याला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. चौघेही विवाहित. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या या व्यक्तीच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाचाच ठरला असता. मात्र व्याधींनी ग्रस्त होऊन गेल्या महिनाभरापासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पिंपरीतील एका खासगी दवाखान्यात त्या व्यक्तीवर उपचार सुरू होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नाही. आता ही व्यक्ती केवळ कागदोपत्री जिवंत आहे. अशा अंतिम काळात खरे तर त्याच्या सेवेला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र पिंपळे गुरव सारख्या ठिकाणी एक गुंठाच्या जमिनीत त्याचे तीन मजली घर त्याच्या चार मुलांच्या मधील नाते संपवणारे ठरले. वडील गेल्यानंतर भाऊ आपल्याला या संपत्तीत हिस्सा देणार नाही असा समज झालेल्या या तिन्ही विवाहित कन्या खरे तर वडिलांच्या आजारपणात कधीच आल्या नव्हत्या. प्रकृती गंभीर झाल्याचे समजल्यानंतर त्या सलग तीन-चार दिवस भेटायला येऊ लागल्या. 19 फेब्रुवारी रोजी मुलगा ऊग्णालयातून बाहेर गेला असताना मुली वडिलांच्या जवळ गेल्या. त्यांनी मृत्युपत्र बनवून आणले होते. त्यावर त्यांनी मृतवत वडिलांच्या अंगठ्याचे ठसे घेतले. दुसऱ्या कागदावर त्यांच्या हातात पेन देऊन सही घेण्याचा प्रयत्न केला. ऊग्णाच्या जवळ सुरू असणाऱ्या काही वेगळ्या हालचालींमुळे ऊग्णालय प्रशासनाचे तिकडे लक्ष गेले आणि त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने मुलींना थांबविले आणि पोलिसांसह त्यांच्या भावाला फोन केला. बहिणींच्या विरोधात मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हे पोलीस ठाणे संत तुकाराम नगर पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते हे विशेष! तीनही बहिणी संपन्न कुटुंबात दिलेल्या, नात्यात किरकोळ वाद असतात. मात्र वाटणीवरून त्यांच्यात कधीच वाद झाला नव्हता. तरीही पित्याच्या सेवे ऐवजी अंतिम काळात संपत्तीसाठी त्यांनी असे का केले? या धक्कादायक प्रश्नाने भावाला नक्कीच हादरवले असेल. मात्र संबंधित कागदपत्रे नष्ट करायला लावून त्याला सुद्धा कौटुंबिक पातळीवर हा वाद मिटवता आला असता. त्याने देखील आपल्या बहिणींच्या या कृतीला माफ न करता चक्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याचा अर्थ त्याचेही मन तितकेच कलुषित आहे. संपत्ती या विषयावरील एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात,
ऐसिया संपत्ती आम्हां संवसारी ।भोगाचिया परि काय सांगा ।
काम तो कामना भोगीतसे देवा।आलिंगणे हेवा चरण चुंबी ।
शांतीच्या संयोगे निरसला ताप । दुसरे ते पाप भेदबुद्धी ।
तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे । आपुले पारिखे निरसले ।
अर्थात, आम्हाला या संसारात अमाप संपत्ती लाभली आहे. ती संपत्ती म्हणजे या विठ्ठलाचे प्रेम!त्या प्रेमाचे आम्ही आंनदाने भोग घेत आहो. याचे वर्णन कसे करावे?आमच्या सर्व कामना इच्छा देवाचे भोग घेत आहेत, त्या विठ्ठलाला आम्ही आलिंगन देऊन त्याच्या चरणाचे चुंबन घेतो. आमची वृत्ती शांत झाली आहे. त्या योगे आमचा ताप निरसला आहे व पापाचे निरसन होऊन आमची सर्व भेदबुद्धी संपली आहे. जिकडे पाहवे तो विठ्ठलच दिसतो. त्यामुळे आमचे व परक्याचे हे भेदच संपून गेले आहे. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील हा भेद संपला असला तरी सख्या भावंडांच्या आयुष्यातील हा भेद आणि त्यांची भेदबुद्धी जेव्हा उफाळून आली त्यातून त्यांना नको त्या दु:खाला सामोरे जावे लागले. संपत्ती ही काहीही झाले तरी चौघांच्या नावावर होऊ शकली असती. थोडाफार वाटा त्यात कमी, जास्त झालाही असता. पण नाती टिकली असती. क्षणभराच्या मोहामुळे बहिणी त्यांच्या भावापासून आणि भाऊ बहिणींच्या मायेपासून पारखा झाला. समाजात बदनामी झाली ती वेगळी. आपल्याच कुटुंबाच्या आणि ओळखीच्या माणसांच्या नजरेतून उतरणे नशिबी आले ते त्याहून अधिक गंभीर. संपत्तीच्या हव्यासाने रक्ताच्या नात्यातील व्यक्तींचा हक्क डावलण्याचे प्रकार हे सगळीकडेच होत असतात. त्यातून लोक एकमेकाच्या जीवावर उठल्याच्या घटना देखील सातत्याने समोर येत असतात. मात्र या घटनेत ब्रेनडेड पित्याच्या मृत्यूपूर्वी त्याची संपत्ती आपल्या नावावर करून घेण्याची ही धडपड समाजात दीर्घ काळ निंदेची तर ठरेलच, मात्र ज्या भावंडांमध्ये असा संपत्तीचा विवाद नाही, मात्र मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. व्यक्तींच्या नात्यात देखील कडवटपणा विनाकारण निर्माण होऊ शकतो! विश्वासावर जीवन जगणाऱ्या आणि अविश्वास बाळगणाऱ्या, सर्वांनाच सावध करणाऱ्या या घटनेतून आपल्या पातळीवर काय करायचे हे जोपर्यंत व्यक्ती म्हणून प्रत्येकजण ठरवत नाही, तोपर्यंत अशा घटना समाजात धक्का देत राहणार. घटना तशी छोटी आणि एका परिवाराशी संबंधित असली तरी व्यक्तींतून समाज बनतो म्हणून समाजाच्या विचारार्थ ती इथे मांडली आहे.