कंपन्यांच्या लोगाचा असाही उपयोग
प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक अनेक अद्भूत उपाय शोधतात, हे आपल्याला माहीत आहे. केवळ प्रसिद्धीसाठीच नव्हे, तर पैसा मिळविण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठीही अनेक लोक अनेक चित्रविचित्र उपाय शोधून काढतात. फ्रान्स या देशात अशीच एक घटना समोर आली आहे. या देशातील डागोबर्ट रेनूफ नामक एका उद्योजकाने लढविलेली शक्कल सध्या चांगलीच प्रसिद्ध होत आहे.
रेनूफ हे एक स्टार्टअप कंपनी चालवितात. त्यांचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले. लग्नात खर्च फार करावा लागतो. हा खर्च काही प्रमाणात भरुन काढण्यासाठी त्यांनी एक उपाय केला आहे. त्यांनी आपल्या लग्नाच्या कोटावर 26 स्टार्टअप कंपन्यांचे लोगो लावून घेतले. अशा प्रकारे त्यांनी या 26 कंपन्यांची जाहिरात आपल्या कोटांवर त्यांचे लोगो लाऊन केली. 25 ऑक्टोबरला त्यांचा विवाह झाला. विवाहाच्या दिवशी त्यांनी हा कोट घातला होता. या कोटावर त्यांच्या स्वत:च्या कंपनीचाही लोगो चिकटविलेला होताच. आता हा उपाय करुन त्यांचा लग्नाचा खर्च किती प्रमाणात भरुन निघाला याची माहिती त्यांनी दिलेली नाही. मात्र, या लग्नाची आणि त्यांच्या कोटाची प्रसिद्धी मात्र जगभर झाली आहे. कंपन्यांचे लोगो लावलेले कोट घालून लग्नाला उभे राहिलेले ते कदाचित, या जगातील प्रथम नवरदेव असण्याची शक्यता आहे. त्यांच्या लग्नाची दृष्ये सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्याने त्यांच्या या कोटालाही भलतीच लोकप्रियता लाभली आहे. लोक त्यांच्या कल्पकतेचे कौतुक करीत आहेत. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स दिले आहेत.
रेनूफ यांनी आपल्या या उपक्रमाचा हेतू स्वत:च स्पष्ट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोटावर कंपन्यांचे लोगो लावण्याचा हेतू पैसे मिळविणे हा तर होताच. पण केवळ पैशासाठी त्यांनी हे केलेले नाही. तर आपल्या खासगी जीवनातील या आनंददायक प्रसंगाचा संबंध आपल्या ‘टेक कम्युनिटी’शी जोडून या प्रसंगाला अविस्मरणीय बनविणे, हाही आपला हेतू आहे. एकंदरीत, एक जगावेगळी कल्पना साकारुन त्यांनी आपला विवाह सोहळा संस्मरणीय बनविला आहे. त्यांच्या काय उपक्रमावर अनेकांनी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. स्वत: रेनूफ आपल्या कल्पनाशक्तीवर भलतेच खूष असल्याचे दिसून येत आहे.