For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयटी कंपन्यांमधील अशीही सुलतानी!

06:38 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयटी कंपन्यांमधील अशीही सुलतानी
Advertisement

पुण्यातील हिंजवडी या विशेषत: संगणक तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील प्रतिष्ठित व प्रस्थापित उद्योग-व्यवसायासाठी प्रसिद्ध असणाऱ्या क्षेत्रातील थिंक टेक इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने अचानकपणे व कुणालाही कसलीही पूर्वसूचना न देता आपले व्यावसायिक कामकाज बंद केल्याने कंपनीच्या सुमारे 500 अभियंते-कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. यापूर्वी असे प्रकार विशेषत: उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये होत असत. मात्र पुण्यातील व त्यामुळे या छोट्या वा मध्यम आकाराच्या उद्योगांमधील प्रसंगी 100-200 कामगारांना बेकारी-बेरोजगारीला सामोरे जाण्याचे प्रसंग बऱ्याचदा घडले आहेत व त्यावर परिस्थितीनुसार व आपापल्यापरीने आंदोलन-संघर्षापासून बदली-स्थलांतर अथवा कायम स्वरूपी काम-कारखाना बंद या सारखे तोडगे स्विकारले गेले असल्याचा इतिहास आहे.

Advertisement

मात्र पुण्यातील अशा प्रकारचा प्रकार म्हणजे आयटीतील आक्रितच ठरले आहे. मुख्य म्हणजे थिंक टेक इंडिया या कंपनीने कुठलाही व कुणाचाही विचार न करता व मुलाहिजा न बाळगता आपल्याच मनमानीपणाने केलेल्या या आक्रस्ताळेपणाला वाचा फुटली ती थिंक टेक इंडियामध्ये काम करणाऱ्या व कंपनी व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे नोकरीला अचानकपणे मुकलेल्या एका शिकाऊ उमेदवाराने याप्रकरणी केलेल्या तक्रारीमुळे. विशेष उल्लेखनीय व महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी पोलिसांकडे नोंदविलेल्या रितसर तक्रारीमध्ये कंपनीने कुठलीही माहिती वा सूचना न देता कंपनीचे व्यावसायिक काम बंद केल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांची नोकरी जाऊन अचानकपणे बेकारीचा सामना करावा लागण्याचा प्रकार म्हणजे स्पष्टपणे कर्मचाऱ्यांची केली गेलेली फसवणूक होय. हा फसवणुकीचा प्रकार गंभीर  असल्याचा आरोप प्रामुख्याने केला आहे.

कर्मचारी-कंपनीच्या वा व्यवस्थापना दरम्यानच्या या अथवा अशा प्रकारच्या तक्रारी सामान्यपणे कामगार कार्यालय अथवा कामगार वा औद्योगिक न्यायालयात दाखल केल्या जातात. मात्र थिंक टेक विरोधातील तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली हे विशेष.

Advertisement

शिकाऊ उमेदवाराच्या तक्रारीत नमूद केल्यानुसार व तपशिलाच्या आधारे पोलिसांनी कंपनीच्या विरोधात कंपनीने कर्मचाऱ्यांचे देय वेतन न देणे व अचानकपणे आपला व्यवसाय बंद करून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून व त्याद्वारे कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कायद्याच्या कलम 316 म्हणजे अपराधीपणे विश्वासघात करणे व कलम 318 म्हणजेच फसवणूक करणे या फौजदारी कलमांतर्गत तक्रार दाखल केली हे यासंदर्भात महत्त्वाचे आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी थिंक टेक कंपनीचे मुख्याधिकारी, प्रशिक्षण व्यवस्थापक व एच. आर. व्यवस्थापक यांच्या विरोधातील तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या संदर्भात प्राथमिक चौकशी करून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे यांना नाशिक येथे अटक करून पुण्याला पुढील चौकशी व कारवाईसाठी आणले.

‘थिंक टेक’च्या कर्मचाऱ्यांनुसार कंपनी प्रामुख्याने संगणक क्षेत्रांतर्गत इतर मोठ्या व्यावसायिक कंपन्यांसाठी ‘अॅप’ ची निर्मिती व विकास हे काम प्रामुख्याने करीत असते. यासाठी आवश्यक अशा संगणक तज्ञ व इंजिनिअर्सची निवड प्रामुख्याने छोट्या शहर-स्थानांवरून करत असे. अशा प्रकारे निवड झालेल्या उमेदवारांना

अॅपवर आधारित कामकाज व वेब सर्व्हिस इ. चे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांच्यामार्फतच कंपनीचे काम प्रामुख्याने होत असे. कंपनीच्या कथित धोरणानुसार ‘थिंक टेक’ नेमणूक करताना कंपनीच्या धोरणात्मक निर्णयानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून

लॅपटॉप देण्यासाठी 15000 रू. घेण्यात येत असत. याशिवाय कंपनीतील कर्मचाऱ्यांना गेले दोन महिने पगारच देण्यात आला नव्हता असेही दिसून आले आहे. अशा प्रकारे कंपनीने कर्मचाऱ्यांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याचा व त्याद्वारे लाखो रूपयांचे नुकसान केल्याचा आरोप कंपनी कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

याप्रकरणी उपलब्ध तपशिलानुसार कंपनीने गेल्या वर्षी इंजिनिअर्स-कर्मचाऱ्यांची मोठी भरती केली. त्यासाठी प्रामुख्याने लहान शहरातील विद्यार्थी-उमेदवारांवर भर देण्यात आला. या नव्याने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दरमहा 15000 रू. वेतन लागू केले. कंपनीच्या या योजनेला अपेक्षेनुरूप व विशेषत: निमशहरी भागातील विद्यार्थी-उमेदवारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या नियमानुसार नव्याने रूजू होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून 15000 रू. लॅपटॉपपोटी घेऊन त्यांना कामावर रूजू करून घेतले.

सुरूवातीला कंपनीत ठीकठाक सुरू होते. मात्र फेब्रुवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना विविध अडचणी येऊ लागल्या. त्यांचे पगार पण पूर्वीप्रमाणे म्हणजे 6 वा 8 तारखेला झाले नाहीत. कंपनी व्यवस्थापनाने जुजबी आश्वासने तर दिली, मात्र कर्मचाऱ्यांचे पगार केले नाहीत. तशातच कंपनीने आता व्यवसायच बंद केल्याने या कर्मचाऱ्यांपुढे पगार न मिळणे व कामबंदमुळे होणारी बेकारी अशा दुहेरी संकटांना सामोरे जावे लागत आहे. काही कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपसाठी 15000 रू. घेऊन पण त्यांना लॅपटॉप न देण्याची फसवणूक झाल्याचे कर्मचाऱ्यांचे रास्त गाऱ्हाणे आहे.

‘थिंक टेक’ कंपनीतील कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचे हे एकमेव उदाहरण नाही. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये काम करणाऱ्या संघटनेनुसार सध्या संगणक क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या सुमारे 4000 हजार नवे अभियंते वा तंत्रज्ञ यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे अथवा कमी केले जाऊ शकते, अशी परिस्थिती आहे. याशिवाय काही आयटी कंपन्यांनी नव्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-उमेदवारांना शिकाऊ-प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करण्यासाठी दिलेली नेमणूकपत्रे राजरोसपणे रद्द केली आहेत. आज मुळातच आधीच्या तुलनेत संगणक शास्त्र आयटी क्षेत्रातील नवागतांना रोजगार मिळण्याच्या संधी व प्रमाण कमी झाले आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स फेडरेशनचे अध्यक्ष सतेश बोंडे यांच्यानुसार 2025-26 या शैक्षणिक वर्षात संगणक क्षेत्रात नव्याने उत्तीर्ण झालेल्या केवळ 40 टक्के विद्यार्थ्यांनाच रोजगार मिळाले त्यातही पण आता त्यांना नोकरी-रोजगार जाण्याची चिंतनीय स्थिती निर्माण झाली आहे. आज असे प्रकार बरेच ठिकाणी होत आहेत. अथवा होऊ शकतात. ‘थिंक टेक’ प्रकरण पुण्याजवळ व हिंजवाडीत घडल्याने गाजत आहे. इतरांचे काय?

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.