For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असे मतदारसंघ, असे उमेदवार...

06:35 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
असे मतदारसंघ  असे उमेदवार
Advertisement
  1. गांधीनगर

(मतदान 7 मे, मतदार 20 लाख 46 हजार)

Advertisement

गुजरातची राजधानी असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून स्पर्धेत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने आर्किटेक्ट असणाऱ्या सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पटेल या पक्षाच्या महाराष्ट्र सहप्रभारीही आहेत. या मतदारसंघात मंगळवारी 7 मे या दिवशी मतदान होत आहे. या मतदारसंघांतील जवळपास 80 टक्के मतदार शहरी असून हा हिंदूबहुल मतदारसंघ आहे. 2014 च्या निवडणुकीत येथून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. 2019 ची निवडणुकीत अडवाणी यांनी भाग घेतला नव्हता. त्या निवडणुकीत येथून अमित शहा यांनीही 68 टक्के मते मिळवून मोठा विजय मिळविला होता.

हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गढ मानला जातो. येथून एकदा अटलबिहारी वाजपेयीही निवडून आले आहेत. तसेच लालकृष्ण अडवाणी यांनी सलग सहा वेळा येथून यश प्राप्त केलेले आहे. वाजपेयी सरकारच्या काळात अडवाणी केंद्रीय गृहमंत्री होते. आता अमित शहा केंद्रीय गृहमंत्री असून ते येथून उमेदवार असल्याने हा मतदारसंघ देशाला गृहमंत्री देणारा म्हणून ओळखला जातो.

Advertisement

शहांना निवडणूक सोपी ?

काँग्रेसचे उमेदवार सोनल पटेल यांच्यासंबंधी लोकांमध्ये चांगले मत असले तरी, अमित शहांना ते तोंड देऊ शकणार नाहीत, असे येथील बहुसंख्य मतदारांनाच वाटत असल्याने शहा यांना निवडणूक सोपी जाऊ शकते. शहा यांचे वजन मोठे आहे. त्यांचा सातत्याने मतदारसंघाशी संपर्क आहे. ते केंद्रात उच्च पदावर असल्याने सरकारी कामेही त्वरेने होतात. त्यामुळे यावेळीही शहा मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असे वातावरण असल्याचे विश्लेषक मानतात.

1967 पासून अस्तित्व

हा मतदारसंघ 1967 पासून आहे. आतापर्यंत 15 लोकसभा निवडणुका येथे झालेल्या असून त्यात चार वेळा काँग्रेस, एकदा जनता पक्ष, आणि दहा वेळा भारतीय जनता पक्ष विजयी झालेला आहे. 1989 पासून 2019 अशी सलग 30 वर्षे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाशीच एकनिष्ठ राहिल्याचे दिसून येते.

  1. आणंद (मतदान 7 मे, मतदार 16 लाख 56 हजार)

या मतदारसंघाची निर्मिती 1957 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत लोकसभेच्या 16 निवडणुका झालेल्या आहेत. तेव्हापासून आतापर्यंतचा कल पाहता येथून काँग्रेसला सर्वाधिकवेळा विजय मिळालेला आहे. भारतीय जनता पक्षाला केवळ चार वेळा तर स्वतंत्र पक्ष एकदा विजयी झालेला आहे. काँग्रेसला 11 वेळा यश प्राप्त झालेले आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविलेला असून यंदाही पुनरावृत्ती घडू शकते.

भारतीय जनता पक्षाने येथे 2019 चे यशस्वी उमेदवार मितेश रमेशभाई पटेल यांनाच उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने अमीत चावडा यांना तिकिट दिले आहे. या मतदारसंघात यंदा रजपूतांचा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री रुपाला यांनी या समाजासंबंधी काही विपरीत उद्गार काढल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे हा समाज नाराज असल्याचे बोलले जाते. या समाजातील काही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी एका मोर्चाचे आयोजनही केले होते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशासाठी या मुद्द्याला फार महत्व मिळणार नाही, अशीही अटकळ आहे. निवडणूक चुरशीची होईल, असाही काही विश्लेषकांचा होरा आहे.

  1. अररिया (मतदान 7 मे, मतदार 18 लाख 90 हजार)

या मतदारसंघाची निर्मिती 1967 मध्ये करण्यात आली. आतापर्यंत येथे 15 मुख्य आणि 1 लोकसभा पोटनिवडणूक अशा 16 निवडणुका झालेल्या आहेत. आतापर्यंत येथून चार वेळा काँग्रेस, एकदा जनता पक्ष, एकदा जनदा दल, तीनदा राष्ट्रीय जनता दल आणि चारवेळा भारतीय जनता पक्ष यशस्वी झालेला आहे. 2014 मध्ये राष्ट्रीय जनता दल तर 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळविलेला आहे. त्यामुळे यंदाही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

मागच्या निवडणुकीत यशस्वी उमेदवार प्रदीप कुमार सिंग यांनाच यावेळीही भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रीय जनता दलाने मोहम्मद शहानवाझ आलम यांना उतरविले आहे. दोन अपक्ष उमेदवारही मैदानात आहेत. गेल्यावेळी प्रदीप कुमार सिंग यांनी 1 लाख 37 हजार मतांनी विजय मिळविलेला होता. या मतदारसंघात मुस्लीमांची संख्या जवळपास 35 टक्के आहे. मात्र, हिंदू-मुस्लीम ध्रूवीकरण झाल्यास भारतीय जनता पक्षाचे पारडे जड ठरते असा अनुभव आहे. यंदा बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध विरोधी पक्षांची आघाडी अशी सरळ स्पर्धा आहे. त्यामुळे चुरशीच्या संघर्षाची अपेक्षा व्यक्त केली जाते.

Advertisement
Tags :

.