असाही एक अद्भूत देश
इटली देशाच्या रोम शहराच्या एका भागात असलेला ‘व्हॅटिकन’ हा देश जगातला सर्वात लहान देश असल्याची माहिती बहुतेकांना आहे. पण या देशापेक्षा काहीसा मोठा मात्र जगातील सर्वात अद्भूत देश कोणता आहे, याची माहिती अनेकांना नसण्याची शक्यता जास्त आहे. या देशाचे नाव आहे ‘तुवालू’. प्रशांत महासागरातील हवाई बेटे आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये या देशाचे स्थान असून या देशाची लांबी 12 किलोमीटर आणि रुंदी 200 मीटर इतकी आहे.
या देशात एकच विमानतळ, एकच पंचतारांकित हॉटेल आणि एकच पोलीस स्थानक आहे. अर्थात, एवढ्या छोट्या देशात ही स्थाने यापेक्षा जास्त असू शकतही नाहीत. हा देश वेगवेगळ्या नऊ बेटांचा समूह असून लोकसंख्या अवघी 12 हजारांपेक्षा काहीशी अधिक आहे. हा देश नितांत सुंदर असल्याचे तेथे जाऊन आलेल्या पर्यटकांचे म्हणणे असते. या द्वीपसमूहाचा शोध इसवीसन 1568 मध्ये ब्रिटीश नौकाविहारींना लागला होता. त्यामुळे ब्रिटनने या देशावर आपला अधिकारही असल्याचे प्रतिपादन केले होते. या देशाचे आणखी एक वैशिष्ट्या असे की येथील लोकांपैकी 95 टक्के लोक देव किंवा धर्म न मानणारे आहेत. ऊर्वरित लोक ख्रिश्चन धर्म मानतात. संसदीय लोकशाही पद्धतीने हा देश चालविला जातो.
अशा या अद्भूत देशाला अलिकडच्या काळात धास्ती वाटते ती समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याची. दोन वर्षांपूर्वी या देशाच्या प्रमुखांनी गुडघाभर पाण्यात उभे राहून देशाला संबोधित केले होते. या देशात उंच प्रदेश नाहीत. बहुतेक सगळा भाग समुद्रसपाटीच्या लगतच आहे. शिवाय या देशाची रुंदी केवळ सरासरी 200 मीटर इतकी असल्याने समुद्राच्या वाढत्या पातळीशी हा देश दोन हात करुच शकत नाही. आज समुद्राच्या पाण्याची पातळी जितकी आहे, तिच्यात 2 मीटरची जरी वाढ झाली, तरी या देशाचा 90 टक्के भाग पाण्याखाली जाऊ शकतो आणि येथील लोकांना ऑस्ट्रेलिया किंवा फिजी या मोठ्या देशांमध्ये आसरा घेण्याची वेळ येऊ शकते. जागतिक तापमानवाढीमुळे ध्रूवांवरील हिमाचे प्रचंड साठे वेगाने वितळत असून जगभरात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. ही प्रक्रिया अशीच राहिली, तर कदाचित येत्या 50 वर्षांमध्ये या देशाचे समुद्रात विसर्जन होऊ शकते. भारताजवळच्या मालदीव देशाची जी परिस्थिती या संदर्भात आहे, तशीच या देशाचीही आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढ नियंत्रणात आणा अशी या देशाची विश्वसमुदायाकडे मागणी आहे. पण हा देश अतिशय लहान असल्याने त्याची ही मागणी मोठ्या देशांच्या कानांपर्यंत पोहचतच आहे, अशी त्याची व्यथा आहे.