ऐसी कळवळ्याची जाती
माणसाच्या हातात त्याचे मरण नसते. ते केव्हा, कुठे कसे येईल हे कुणालाही माहीत नसते. तरीही माणूस चिरंजीवी थाटात जगत असतो. भविष्याची स्वप्ने रंगवत असतो. मृत्यूचे भय सर्व प्राणीमात्रांमध्ये असते. ते माणसामध्ये असू नये यासाठी संतांची धडपड आहे. मृत्यू म्हणजे काय हे समजून जगावे हेच संतचरित्र, अभंग यांचे मर्म आहे. आत्मस्वरूपाचा अर्थात ईश्वराचा या देहातच साक्षात्कार म्हणजे नक्की काय तर निर्भयता. जीवनाकडे बघण्याचा विश्वव्यापी अनुभव.
ती रोजचीच नित्याची सकाळ होती. भाजीबाजारात नेहमीप्रमाणे गर्दी, धावपळ होती. लगबग होती. एक भाजीवाली तिच्या मुलासह भाजी मांडत होती. वर्षानुवर्षांसारखी. उन्हासाठी सावली म्हणून सवयीने तिने मांडवाची एक दोरी शेजारच्या इलेक्ट्रिक खांबाला बांधली आणि..... तिथेच अघटित घडले. त्या खांबामध्ये काळ तिची प्रतीक्षा करीत होता. त्या दिवशी त्यात अकस्मात वीजप्रवाह उतरला आणि तिचे दोन्ही हात खांबाला चिकटले. जवळ असलेला मुलगा, शेजारी उभी असलेली बहीण, रोजचे सहकारी दूर स्तब्ध, सावध उभे राहिले. तिला वाचवण्याची इच्छा असूनही कोणीही तिला स्पर्श करू शकत नव्हते. नंतर कुणीतरी लाकूड आणून वीजप्रवाह बंद करून तिला सोडवले. मात्र तोपर्यंत तिचे प्राणपाखरू अवकाशात उडून गेले. हे दृश्य बघितले तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी ओठांवर आली. ‘हे काळा न काळाची कुंडी। घातली लोणियाची उंडी। माशी पांखु पाखडी। तंव हे सरे।।’ देह म्हणजे कालरुपी अग्नीच्या कुंडात घातलेला लोण्याचा गोळा आहे. माशीला पंख फडफडायला जेवढा वेळ लागतो तितक्या काळातच हा देह पडतो. त्या भाजीवाल्या बाईंनी घरून आणलेला जेवणाचा डबा तिथेच पडला होता. तिला कुठे ठाऊक होते की आज आपणच काळाचे भक्ष्य आहोत ते. माणसाच्या हातात त्याचे मरण नसते. ते केव्हा, कुठे कसे येईल हे कुणालाही माहीत नसते. तरीही माणूस चिरंजीवी थाटात जगत असतो. भविष्याची स्वप्ने रंगवत असतो.
मृत्यूचे भय सर्व प्राणीमात्रांमध्ये असते. ते माणसामध्ये असू नये यासाठी संतांची धडपड आहे. मृत्यू म्हणजे काय हे समजून जगावे हेच संतचरित्र, अभंग यांचे मर्म आहे. आत्मस्वरूपाचा अर्थात ईश्वराचा या देहातच साक्षात्कार म्हणजे नक्की काय तर निर्भयता. जीवनाकडे बघण्याचा विश्वव्यापी अनुभव. श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र सांगताना पू. बाबा बेलसरे म्हणतात, मरणाधीन असलेल्या शरीरामध्ये समर्थांना अमृताचा अनुभव आला.
अध्यात्माच्या भाषेत सांगायचे तर देहीपणाने ते सर्वांना दिसले. पण विदेहीपणाने राहिले. कारण जग आणि जीवन यांना व्यापून असणारे ईश्वराचे अधिष्ठान ते कधी विसरले नाहीत. समर्थ रामदास स्वामी म्हटले की ‘जय जय रघुवीर समर्थ’ हा गजर मुखातून येतो. राम कर्ता हे वारंवार ठसवणारे समर्थ ‘मृत्यू निरूपण’ या समासामध्ये म्हणतात, ‘मानवी जीवनावर प्रभुत्व काळाचे आहे. त्याची दिशा मृत्यू आहे. तो कुठे कसा यायचा हे माणसाच्या कर्मावरच अवलंबून आहे. मृत्यू हा उधार नाही. आजचा उद्यावर ढकलता येत नाही.’ पूर्वीच्या काळी व्यवहारात ‘माप’ अतिशय महत्त्वाचे साधन होते.
बाजारामध्ये धान्य मापाने मिळत असे. स्वयंपाकघरात विविध प्रकारची मापे होती. त्यात हाताची मूठ, चिमूट, ओंजळ हेही असायचे. पायली, शेर हे मोजमाप होते. वस्त्रप्रावरण हे मापाने शिवून परिधान करायचे. माप चुकले की अंदाज चुकायचा. समर्थ माणसाच्या देहाला ‘माप’ म्हणतात. संसार म्हणजे ‘सवेच स्वार। नाही मरणास उधार। मापी लागले शरीर। घडीने घडी।।’ माणसाच्या शरीराला क्षणाक्षणाचे म्हणजे घडीघडीचे माप लागले आहे. त्याचे आयुष्य क्षणाक्षणांनी संपते आहे. समर्थांचे मृत्यूनिरूपण विलक्षण आहे. मरण हा शब्दही ज्यांना सहन होत नाही त्यांना हे आवडणार नाही हे जाणून समर्थ म्हणतात, ‘श्रोती कोप न करावा.’ श्रोत्यांनी रागवू नये. कारण हा मृत्यूलोक आहे. जन्माला आलेले सगळेच गेले. मग टिकले कोण? तर ते संत. तेच स्वरूपाकार आत्मज्ञानी झाले.
एका राज्याची अनोखी कथा आहे. त्या राज्यात जो राजा सत्तेवर यायचा. त्याने पाच वर्षे मनसोक्त अधिकार वापरून सत्ता उपभोगायची. मात्र नंतरचे आयुष्य राज्यापलीकडल्या जंगलात घालवायचे. पुन्हा मागे वळून बघायचे नाही. आनंदाने राज्याचा उपभोग घेणारे राजे जेव्हा एक नदी पार करून जंगलात जात तेव्हा अतिशय शोकमग्न असत. एकदा एक हुशार राजा गादीवर बसला व त्याने विचारले, ‘पाच वर्षे मी मनाप्रमाणे सत्ता अधिकार वापरू शकतो ना?’ होकार मिळताच राजाने आपल्या राज्यात सोयीसुविधा तर केल्याच परंतु पाच वर्षांनंतर नदीपलीकडे असलेल्या जंगलाच्या परिसराचा विचार करून तिथे सोयी करण्यास प्रारंभ केला. पिण्याचे पाणी, उत्तम वसाहत, उद्याने, शेती, वीज यावर लक्ष केंद्रित केले.
रस्ते, घाट बांधले. पाच वर्षांनी जेव्हा राज्याची सत्ता संपली तेव्हा तो आनंदाने नदीपलीकडे जाण्यासाठी नावेत बसला आणि हसतहसत पलीकडे गेला. या दृष्टांताचा मथितार्थ असा आहे की ‘कर्म तसे फळ.’ आयुष्य जगताना एक दिवस हे सारे सोडून जायचे आहे याचा विचार करून पुण्यकर्म केले तर पारलौकिक प्रवास आनंदाचा होतो. मृत्यूची भीती संपते. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘पक्षी अंगणी उतरती। ते का गुंतोनी राहती। ऐसे असावे संसारी। जोवरी प्राचीनाची दोरी। वस्तीकर वस्ती आला। प्रात:काळी उठून गेला । एका जनार्दनी शरण। ऐसे असता भय कवण।।’ ही प्रपंचामधल्या परमार्थाची शिकवण आहे.
पूर्वजन्म आणि पुनर्जन्म याविषयी मानवाला पूर्वापार गूढ आकर्षण वाटत आले आहे. मागील जन्माचा स्मरणाचा दोर परमेश्वराने कापून टाकला आहे. त्यामुळे जन्ममृत्यूच्या खेळामधला मृत्यू म्हणजे काय हे त्याला कळत नाही. भीती तेवढी उरली आहे. त्यासाठी ‘कर्म तसे फळ’ हा उपदेश संतांनी केला आहे. रामायण, महाभारत, शिवलीलामृत, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ग्रंथाचे श्रद्धापूर्वक वाचन केले की त्यातील मर्म उलगडते. श्री भावार्थरामायणामध्ये श्रावण बाळाच्या पूर्वजन्मीची कथा आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, एका जलाशयाजवळ दोन पक्ष्यांचा निवास होता. जलात राहणाऱ्या एका माशाशी त्यांची मैत्री झाली. उन्हाळ्यात जेव्हा जलाशय आटू लागला तेव्हा माशाचे प्राण धोक्यात आले. तेव्हा त्या पक्ष्यांच्या जोडीने माशाला आपल्या चोचीत धरून, वाहून एका मोठ्या जलाशयाकडे नेण्याचे ठरवले. वाटेत विघ्न आले.
माशाला एका लाकडाचा धक्का लागून त्याचे तुकडे झाले. या घटनेमुळे पक्ष्यांना तीव्र दु:ख झाले व त्यांनी प्राण सोडले. पुढे हे ऋणानुबंधी जीव पुढच्या जन्मात एकत्र आले. दोन पक्षी माता-पिता आणि मासा हे त्यांचे अपत्य झाले. तो श्रावणबाळ. भावार्थरामायणात अशा पुष्कळ कथा आहेत. सुवर्चसा नावाची एक नर्तकी सत्यलोकात मद्य पिऊन आली तेव्हा ब्रह्मदेवाने तिला घार होशील असा शाप दिला. भानावर येऊन ब्रह्मदेवाची क्षमा मागून तिने उ:शाप मागितला तेव्हा चतुरानाने तिला माफ करून म्हटले की अयोध्या नगरीत जेव्हा राजा दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करेल तेव्हा तुला कैकयीच्या हातातला यज्ञप्रसाद मिळेल. तो सेवन केल्यावर तू मुक्त होशील. त्याप्रमाणे रागावलेल्या कैकयीच्या हातातील प्रसादावर झडप घालून घारीने तो प्रसाद पळवला व ती मुक्त झाली. संत एकनाथ महाराज लोकशिक्षक होते. मानसिक आणि सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी निरनिराळ्या कथा सांगितल्या आणि श्रीरामनामाकडे समाजाचे मन वळवले. त्यात मृत्यूचा फेरा चुकवण्याचे सामर्थ्य आहे हे समाजमनावर बिंबवले. संत एकनाथांचे हे ऋण न फिटणारे आहे.
-स्नेहा शिनखेडे