जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण यशस्वीपणे राबवा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ता. पं. ईओंशी संवाद
बेळगाव : जिल्ह्यातील सर्व ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्राम) योजनेंतर्गत तालुक्यात बांधण्यात आलेल्या सर्व घटकांचे कामकाज व शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलावीत. तसेच ग्रा. पं. व नागरिकांना स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण-2025 बद्दल माहिती व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करावे. सदर योजनेंतर्गत मिळत असलेल्या सुविधांची माहिती मोबाईल अॅपद्वारे जनतेला द्यावी. जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2025 चे सर्वेक्षण कार्य यशस्वी करावे, अशी सूचना जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, स्वच्छ भारत मिशन (ग्राम) योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण स्वच्छता, स्वच्छता राखणे, सुका व ओला कचरा व्यवस्थापन, उघड्यावरील शौचमुक्त करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2025 आयोजित करण्यात येतो. जेणेकरून या सर्व घटकांना प्रोत्साहन मिळून ग्रामीण भागात स्वच्छता राखण्यास मदत होते. सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्हा व ग्रा. पं. च्या प्रगतीचे मूल्यांकन करून गुण देण्यात येतात. यानंतर क्रमवारपणे गुण मिळवणाऱ्या जिल्ह्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2025 च्या सर्वेक्षण कामासाठी प्रत्येक जिल्ह्यातील 20 गावांची निवड करण्यात आली आहे. वैयक्तिक घरगुती शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, ओला कचरा व्यवस्थापन, शेणखत केंद्र, माहिती व शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसएसजी-2025 अॅपच्या माध्यमातून योजनेंतर्गत मिळणाऱ्या सुविधांबाबत जनतेकडून मते घेतली जाणार आहेत, असेही शिंदे म्हणाले. सर्वेक्षणाचे काम 22 जून ते 15 जुलैअखेर होत आहे. केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने या कामासाठी लखनौ येथील अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेचे प्रतिनिधी केंद्र सरकारकडून गावांना देण्यात आलेल्या तारखेला भेट देऊन सर्वेक्षण करणार आहेत. यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत पीडीओंना ता. पं. ईओंनी सूचना द्याव्यात, अशी सूचनाही शिंदे यांनी दिली.