रणगाडाभेदी क्षेपणास्त्र यंत्रणेचे यशस्वी परीक्षण
सैन्याच्या ताफ्यात सामील होण्याचा मार्ग मोकळा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्याने सहजपणे कुठेही नेता येणारी आणि शत्रूच्या रणगाड्यांना लक्ष्य करण्यास सक्षम स्वदेशनिर्मित ‘मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गायडेड मिसाइल’ (एमपीएटीजीएम) शस्त्र प्रणालीचे यशस्वी परीक्षण केले आहे. या यशस्वी परीक्षणामुळे सैन्याच्या ताफ्यात याच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही शस्त्रप्रणाली डीआरडीओने विकसित केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रणालीच्या यशस्वी परीक्षणासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि सैन्याचे कौतुक केले आहे. या आधुनिक तंत्रज्ञान आधारित रक्षा प्रणालीच्या विकासात आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे. एमपीएटीजीएमच्या टेंडेम वॉरहेट सिस्टीमचे परीक्षण पूर्ण झाले आहे. ही प्रणाली आधुनिक कवचाने संरक्षित रणगाड्यांना नष्ट करण्यास सक्षम आढळून आल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले आहे.
तंत्रज्ञान सिद्ध करण्याच्या उद्देशाने एमपीएटीजी शस्त्र प्रणालीचे अनेकदा मूल्यांकन करण्यात आले आहे. या शस्त्रप्रणालीचे 13 एप्रिल रोजी पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये यशस्वी परीक्षण करण्यात आले. यात क्षेपणास्त्राची कामगिरी उल्लेखनीय आढळून आली आहे. ही शस्त्रप्रणाली दिवसा तसेच रात्री दोन्हीवेळच्या अभियानासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून रविवारी सांगण्यात आले. डीआरडीओ अध्यक्ष समीर कामत यांनी या परीक्षणाशी निगडित सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.