प्रलय क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण
भारताची ऐतिहासिक कामगिरी : 500 किमीवरील दोन लक्ष्यांचा वेध
वृत्तसंस्था, चांदीपूर
भारताने संरक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ओडिशातील चांदीपूर येथून प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. एकाच लॉन्चरमधून दोन क्षेपणास्त्रे सलग डागण्याची क्षमता या चाचणीतून सिद्ध झाली आहे. सुमारे 500 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले हे स्वदेशी क्षेपणास्त्र शत्रूच्या दोन स्वतंत्र लक्ष्यांवर एकाच वेळी हल्ला करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
प्रलय हे क्वासी-बॅलिस्टिक प्रकारचे क्षेपणास्त्र आहे. पारंपरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या तुलनेत त्याच्या उ•ाणाचा मार्ग बदलण्याची क्षमता अधिक असल्याने शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेसमोर त्याला रोखण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते. कमी उंचीवरून उ•ाण करताना दिशा बदलण्याची आणि अंतिम टप्प्यात हालचाली करण्याची क्षमता हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्या आहे.
दोन क्षेपणास्त्रांचा एकाचवेळी मारा
एकाच लॉन्चरमधून दोन क्षेपणास्त्रे सलग डागण्याच्या क्षमतेमुळे सैन्याला कमी वेळेत अनेक लक्ष्यांवर हल्ला करता येऊ शकतो. या चाचणीमुळे भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील प्रगती अधोरेखित झाली आहे. दोन क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण एकाच वेळी किंवा सलग करताना त्यांच्या उ•ाणावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होऊ नये, यासाठी अत्यंत अचूक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते.
पाकिस्तान सीमेवर तैनातीची तयारी
प्रलय क्षेपणास्त्राचा समावेश भारतीय लष्कर आणि हवाई दलात करण्याची योजना आहे. पश्चिम आणि उत्तर सीमेवरील सामरिक गरजा लक्षात घेऊन या क्षेपणास्त्राच्या तैनातीची तयारी सुरू आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून 120 क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
क्वासी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे काय?
सामान्य बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा उ•ाणमार्ग तुलनेने निश्चित असतो. मात्र, क्वासी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उ•ाणादरम्यान दिशा बदलू शकते. त्यामुळे त्याचा अचूक मार्ग ओळखणे आणि त्याला रोखणे अधिक कठीण होऊ शकते. प्रलयची ही क्षमता शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आव्हान देणारी ठरू शकते.
24 तासांत डीआरडीओचे दुसरे यश
प्रलयच्या चाचणीपूर्वी डीआरडीओने कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या (व्हीएसएचओआरएडीएस) तीन यशस्वी चाचण्या घेतल्या होत्या. या प्रणालीचा उपयोग कमी अंतरावरील हवाई लक्ष्यांना रोखण्यासाठी होतो. सलग मिळालेल्या या यशांमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला आणखी बळ मिळाले आहे. प्रलयच्या पुढील आवृत्त्या आणि अधिक पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवरही काम सुरू आहे.
