स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
1,500 किलोमीटर मारक क्षमता : आवाजापेक्षा 5 पट जास्त वेग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भुवनेश्वर
डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) शनिवारी रात्री लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणीही यशस्वीपणे पूर्ण केली. हे क्षेपणास्त्र ओडिशाच्या किनारपट्टीजवळील एपीजे अब्दुल कलाम आझाद बेटावरून ग्लाइड केलेल्या वाहनातून सोडण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंबंधीचा व्हिडिओ शेअर करत चाचणी फत्ते केल्याची माहिती दिली. ही चाचणी देशासाठी संरक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणारी ठरणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सकाळी ‘एक्स’वर पोस्ट करताना या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत अशा लष्करी तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या गटात सामील झाल्याचे स्पष्ट केले. ही देशासाठी मोठी उपलब्धी आणि ऐतिहासिक क्षण आहे. हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हैदराबादस्थित डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स प्रयोगशाळा आणि इतर डीआरडीओ उपक्रमांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची मारक क्षमता 1,500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या क्षेपणास्त्राद्वारे शत्रूवर हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही ठिकाणांहून हल्ला केला जाऊ शकतो. प्रक्षेपणानंतर या क्षेपणास्त्राचा वेग 6,200 किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच ही गती आवाजाच्या वेगापेक्षा 5 पट जास्त असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
क्षेपणास्त्र चाचणीवेळी डीआरडीओचे शास्त्रज्ञ आणि सशस्त्र दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. वेगवेगळ्या रेंज सिस्टीमद्वारे त्याचा मागोवा घेण्यात आला. त्यानंतर क्षेपणास्त्राच्या उ•ाणाशी संबंधित डेटाने त्याचा प्रभाव आणि अचूक लक्ष्य निश्चित केले. क्षेपणास्त्राच्या उ•ाण मार्गाचा मागोवा घेतल्यानंतर चाचणी यशस्वी मानली जात आहे. चाचणी यशस्वीतेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
हायपरसोनिक क्षेपणास्त्राची वैशिष्ट्यापूर्णता
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र व्रुझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र या दोन्ही वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. हे क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाते. यानंतर ते जमिनीवर किंवा हवेत असलेल्या लक्ष्याला अचूक टार्गेट करते. त्यांना रोखणे फार कठीण आहे. तसेच त्याचा वेग जास्त असल्याने रडार यंत्रणाही त्याला रोखू शकत नाही. सध्या जगातील अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि भारत या फक्त पाच देशांकडे हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची क्षमता आहे. अनेक देश त्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेले आहेत.