‘अग्नि-5’ची यशस्वी चाचणी
5,000 किमीपर्यंत मारक क्षमता ः आता चीनमधील बहुतांश शहरे आली टप्प्यात ः रात्रीच्यावेळी चाचणी
@ बालासोर / वृत्तसंस्था
भारताने अग्नि-5 या अणु-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची गुरुवारी रात्रीच्यावेळी यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र काही नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले असून आता ते पूर्वीपेक्षा हलके झाले आहे. आता हे क्षेपणास्त्र 5,000 किमी अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम झाले आहे. यापूर्वीही या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली असली तरी आता तंत्रज्ञानातील बदलामुळे पुन्हा चाचणी घ्यावी लागली.
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीनंतर वाढलेल्या तणावादरम्यान भारताने गुरुवारी अण्वस्त्र-सक्षम भूपृ÷ावरून मारा करणाऱया अग्नि-5 ची यशस्वी चाचणी केली. संरक्षण तज्ञांच्या मते, हे क्षेपणास्त्र बीजिंग, शांघाय, ग्वांगझू आणि हाँगकाँगसह संपूर्ण चीनला लक्ष्य करण्यास सक्षम आहे. ओडिशाच्या बालासोर किनाऱयावरील अब्दुल कलाम चाचणी तळावरून ही चाचणी करण्यात आल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. या क्षेपणास्त्रात तीन टप्प्यांमध्ये घन इंधन इंजिन बसवण्यात आले आहे. अग्नि-5 मध्ये पाच हजार किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
नवीन उपकरणे, तंत्रज्ञानाने सुसज्ज
क्षेपणास्त्रावर बसवण्यात आलेले नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणांची चाचणी घेण्यासाठी याची चाचणी घेण्यात आल्याचेही संरक्षण सूत्रांनी सांगितले. हे क्षेपणास्त्र आता पूर्वीपेक्षा हलके झाले आहे. एवढेच नाही तर गरज भासल्यास अग्नि-5 क्षेपणास्त्राची रेंज वाढवण्याची क्षमताही विकसित करण्यात आली आहे. नवीन अग्नि-5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता 8,000 किमी पर्यंतही जाऊ शकते, असा दावा अनेक अहवालांमध्ये केला जात आहे.
सर्वात आधुनिक शस्त्र
अग्नि मालिकेतील आंतरखंडीय क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. अग्नि-5 ची उंची 17 मीटर आणि व्यास 2 मीटर आहे. या क्षेपणास्त्राचे वजन 50 टन असून ते 1.5 टनांपर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. अग्नि-5 क्षेपणास्त्र ध्वनीच्या 24 पट वेगाशी स्पर्धा करू शकते. ‘अग्नि-5’ हे त्याच्या मालिकेतील सर्वात आधुनिक शस्त्र आहे. त्यात नेव्हिगेशनसाठी नवीन तंत्रज्ञान जोडण्यात आले आहे. त्याची आण्विक सामग्री वाहून नेण्याची क्षमताही इतर क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा खूप जास्त आहे.
पाकिस्तान-चीन ‘अग्नि’च्या टप्प्यात
सद्यस्थितीत फार कमी देशांकडे आंतर-महाद्वीपीय क्षेपणास्त्र प्रणाली आहे. या देशांमध्ये पाकिस्तानचाही समावेश नाही. ही प्रणाली असलेल्या देशांमध्ये अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि उत्तर कोरियाचा समावेश आहे. भारताकडे आधीच 700 किमी रेंजचे अग्नि-1,2,000 किमीपर्यंतच्या रेंजचे अग्नि-2,2,500 किमी ते 3,500 किमीच्या रेंजपर्यंत मारा करू शकणारी अग्नि-3 ही क्षेपणास्त्रे सज्ज आहेत. पाकिस्तानविरुद्ध बनवलेल्या रणनितीनुसार ही तिन्ही क्षेपणास्त्रे तयार करण्यात आली आहेत. तर अग्नि-4 आणि अग्नि-5 चीनला डोळय़ासमोर ठेऊन तयार करण्यात आली आहेत.